कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरासह तालुक्यात अवैध व्यवसायांनी पून्हा कहर माजवला आहे. मटका, जूगार, झटपट लाॅटरी, चकरी आॅनलाईन कॅसिनो सारख्या अवैध धंद्यामुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे हे अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या मागणीसाठी सी आर सामाजिक संघटनेच्यावतीने अमोल तानाजी कांबळे आपल्या सहकार्यासंह तहसिलदार कचेरीसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.
सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, कराड शहर व तालुका पोलिस, उपविभागीय पो. अधिकारी, तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गेली अनेक वर्षापासून कराड शहर व तालुक्यात या अवैध व्यवसायामुळे हजारो कुटूंबे उध्दवस्त झाली आहेत. कराड तालुक्यातील विविध संघटना, सामाजीक कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते यांनी तसेच ग्रामस्थांनी व समाजातील व्यक्तींनी वेळोवेळी निवेदने दिली, आंदोलने केली, उपोषणे केली, तरी देखील अवैध व्यवसाय बंद झाले नाहीत.
कराड शहर व तालुका पोलीस प्रशासनाने याबाबत योग्य ती दखल घेवून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पदभार स्विकारल्या नंतर अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करू व मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करु असे वक्त्व केले होते. दस का दम चकरी ऑनलाईन कॅसिनो व वेगवेगळया पध्दतीच्या मशिनद्वारे व चिंगपाँग मशिनद्वारे व्यवसाय करून सर्व सामान्य लोकांची फसवणूक करून त्याची आर्थिक दिवाळखोरी करून स्वतः गलेलठ्ठ बनून समाजा मध्ये वावरत आहेत. या व्यक्तींची दस का दम चकरी ऑनलाईन कॅसिनो पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करून चालक व मालक यांच्यावर कठोर कारवाई करावी.
कराड तालुक्यात व कराड शहरात केमिकल मिश्रीत ताडी, जुगार क्लब, झटपट लॉटरी, अवैध मटका या व्यवसायामुळे शेकडो कुटूंबे, तरूण पिढी बरबाद होवून त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. तसेच कर्जबाजारी होवून आत्महत्या ही करीत आहेत. त्यामुळे कुटूंबात भितीचे वातावरण निर्माण होवून कुटूंबे भयभीत होत आहेत. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? पोलीस प्रशासनाने याचे उत्तर दयावे, असेही या निवेदनात म्हंटले आहे.