सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहरातील व कराड शहरातील अनेक शिक्षण संस्थामधील शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परिक्षेच्या तोंडावर या संपामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. या कर्मचाऱ्यांनी बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले आहे.
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी कॉलेज आणि धनंजय गाडगीळ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथेही कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली.
प्रमुख मागण्यांमध्ये 58 महिन्याचे थकबाकी अदा करावी. याबरोबरच आश्वासित प्रगती योजना सुरू ठेवावी. अशा विविध मागण्यांसाठी मागील महिनाभरात वेगवेगळी तीन टप्प्यात आंदोलने कर्मचाऱ्यांनी पार पडली आहेत. शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे आज पासून सर्वच कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.