Independence Day 2023 : स्वातंत्र्यानंतर भारताने मिळवल्या ‘या’ उपलब्धी; संपूर्ण जगात भारताचाच डंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Independence Day 2023)। येत्या १५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्यदिन असून यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आणि संपूर्ण जगात आपला दबदबा निर्माण केला. शेती असेल, तंत्रज्ञान असेल, खेळ असेल किंवा नोकऱ्या अथवा व्यवसाय असोत या प्रत्येक क्षेत्रात भारताने आपला डंका पेटवला असून संपूर्ण जग आपल्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. यंदाच्या भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या देशाने काय काय उप्लबध्या मिळवल्या याबाबत आढावा घेणार आहोत.

1947 – 1957 च्या काळात कृषी, विज्ञान, पायाभूत सुविधा आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांच्या नियोजनाच्या उद्देशाने सर्वप्रथम 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. योजनेचा पहिला मसुदा जुलै 1951 मध्ये सादर करण्यात आला. त्यात ‘वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन’ हा विशेष अध्याय होता. पहिली योजना म्हणून देशात वैज्ञानिक संशोधनाचा पाया रचण्यास प्राधान्य दिले. राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रांच्या निर्मितीवर आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. आणि राष्ट्रीय स्तरावर ११ संशोधन संस्थांना मान्यता दिली आणि देशाच्या भविष्यातील विकासात त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

1957 – 1967 या काळात कृषी संशोधन आणि ‘हरितक्रांती’ मध्ये यश मिळवलं. सरकारने कृषी सुधारण्यासाठी वैज्ञानिक संशोधनाला प्राधान्य दिले. त्यामुळे या दशकात हरितक्रांती झाली. याचेच फळ म्हणजे 1947 मध्ये उध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेली भारताची कृषी अर्थव्यवस्था स्थिर प्रगती करू शकली. आणि अन्नधान्याचा आयातदार असलेला भारत अतिरिक्त उत्पादनाकडे वळला.

1967 – 1977 च्या दशकात भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ची स्थापना करण्यात आली. भारताने आर्यभट्ट नावाचा पहिला उपग्रह सोडला .आर्यभट्ट अंतराळयानाची रचना आणि निर्मिती भारतात करण्यात आली आहे. इस्रोने क्ष-किरण खगोलशास्त्र, सौर भौतिकशास्त्र इत्यादी संशोधनासाठी आर्यभट्ट विकसित केले. यामुळे अंतराळ संशोधनात इस्रोच्या यशाची सुरुवात झाली.

1977 – 1987 या दशकात भारतने अग्नी या आपल्या पहिल्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. तेव्हापासून भारताने अनेक क्षेपणास्त्रे विकसित, चाचणी आणि कार्यान्वित केली आहेत. पुढे 1987 – 1997 च्या दशकात DNA-आधारित फिंगरप्रिंट चाचणी भारतात सुरु करण्यात आली. CSIR आणि CCMB यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञान स्वतः विकसित करणारा आणि वापरणारा भारत हा तिसरा देश ठरला. त्यानंतर 1997 – 2007 च्या काळात भारताने राजस्थानमधील पोखरण येथे भूमिगत असलेल्या पाच अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. या चाचण्यांना ‘पोखरण-II’ असे नाव देण्यात आले. याच दशकात १९८३ साली भारताने संपूर्ण जगाला चकित करत पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता.

2007 – 2017 च्या काळात भारताने आपले चांद्रयान-1 हे चंद्रावरचे पहिले मिशन श्रीहरिकोटा येथून लॉन्च केलं. चंद्राच्या आसपास असलेले रासायनिक, भूवैज्ञानिक आणि खनिज नकाशे देण्यासाठी हे यान पाठवण्यात आलं होते. याच काळात म्हणजे 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळाच्या शोधासाठी भारताने ऐतिहासिक मंगळयान अंतराळयान सोडलं. यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रातील भारताचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं. क्रिडा क्षेत्रात सुद्धा भारताने २०११ मध्ये तब्बल २८ वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. तसेच 27 मार्च 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘पोलिओ मुक्त देश’ प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आरोग्य क्षेत्रासाठी हि सर्वात मोठी उपलब्धी होती.

कोरोना महामारीतुनही देश सावरला – (Independence Day 2023)

यानंतर भारताने २०२० मधील कोरोना महामारीवर सुद्धा जोमाने लढा देत इथेही यश मिळवलं आणि ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुधारली. भारताने बनवलेल्या कोरोना लसीचा वापर संपूर्ण जगाने केला आणि यामुळे भारताची मान अभमानाने उंचावली. सध्या भारत हा जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. भारतात व्यवसाय, नोकऱ्या यांसाठी अतिशय पोषक वातावरण असून जगातील कंपन्याही भारतात निसंकोचपणे गुंतवणूक करत आहेत. अशाप्रकारे स्वातंत्र्यानंतर भारताने मोठ्या उपलब्धी मिळवल्या आहेत आणि जगात आपलं नाव रोशन केलं आहे.