नवी दिल्ली । अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनची कोविड -19 विरूद्ध सिंगल-डोस लस भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर झाली आहे. भारतात मंजूर होणारी ही पाचवी लस आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. गुरुवारी, कंपनीने एक निवेदन जारी केले होते, ज्यात असे सांगण्यात आले होते की,” भारतात सिंगल डोस लसीच्या इमर्जन्सी युझ ऑथोरायझेशन EUA साठी अर्ज करण्यात आला आहे.”
मांडवीया यांनी ट्विट केले,”भारताने लसींची संख्या वाढवली आहे ! जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल-डोस कोविड -19 लस भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर झाली आहे. आता भारताकडे पाच EUA लस आहेत. त्यांनी लिहिले,’ यामुळे कोविड -19 विरुद्ध भारताचा संयुक्त लढा आणखी पुढे जाईल. यामुळे लोकांसाठी कोविड -19 सिंगल डोस लस आणण्याचा मार्ग मोकळा होईल. याआधी, कंपनीने म्हटले होते की,’जॉन्सन अँड जॉन्सनच्या जागतिक पुरवठ्यामध्ये जैविक-ई प्रमुख भूमिका बजावेल.’
5 ऑगस्ट रोजी जॉन्सन अँड जॉन्सनने EUA साठी अर्ज केला. या अमेरिकन फार्मा कंपनीने दावा केला होता की, क्लिनिकल चाचण्यांमध्ये गंभीर रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांची लस 85 टक्के प्रभावी आहे. या व्यतिरिक्त, लसीने डेल्टा आणि कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएन्टपासून चांगले संरक्षण दिले. डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या कहरात नवीन लसीची एंट्री महत्त्वाची ठरू शकते.
देशातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार करण्यात आलेले कोविशील्ड, भारत बायोटेक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी, कोव्हॅक्सिन, अमेरिकन कंपनी मॉडर्ना आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही यांच्या लसींना परवानगी मिळाली आहे. सध्या सरकारी आणि खाजगी केंद्रांवर कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
विशेष गोष्ट म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनची ही लस अत्यंत कमी तापमानात ठेवण्याची गरज नाही. असेही म्हटले जात आहे की, हि लस एकाच डोसमध्ये रुग्णावर उपचार करू शकते. कंपनीने लसीमध्ये एडेनोव्हायरसचा वापर केला आहे. रुग्णाच्या शरीरात पोहोचल्यानंतर पेशी कोरोना विषाणू प्रोटीन तयार करतात. यानंतर, हे प्रोटीन रोगप्रतिकारक शक्तीला विषाणूचा सामना करण्यास मदत करतात.