हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन India UK FTA । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर असून मोदींचा यंदाचा ब्रिटन दौरा खूप खास असणार आहे. या दौऱ्यामध्ये ते ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतील. यावेळी मोदींच्या उपस्थितीत भारत आणि ब्रिटन आज लंडनमध्ये मुक्त व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी करणार आहे. या नवीन करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक, राजकीय आणि प्रादेशिक संबंधांना नवीन दिशा मिळेल. तसेच अनेक उत्पादनावरील आयात आणि निर्यात स्वस्त होईल. मात्र हा करार अंमलात येण्यापूर्वी त्याला ब्रिटिश संसदेची मान्यता आवश्यक असेल. या प्रक्रियेला सुमारे एक वर्ष लागू शकते.
भारत-यूके मुक्त व्यापार करार (India UK FTA) 2030 पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट करून US $ 120 अब्ज पर्यंत पोहोचण्यास मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या उपस्थितीत व्यापक आर्थिक आणि व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी केली जाईल. या मुक्त व्यापार कराराचा परिणाम केवळ कंपन्या किंवा व्यावसायिकांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरही होईल. अनेक गोष्टी स्वस्त होऊ शकतात, तर काही गोष्टींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
कोणत्या वस्तू स्वस्त होणार ? India UK FTA
भारत-ब्रिटन करारानंतर, अनेक उत्पादनांवरील कर कमी होईल. ज्यामुळे व्हिस्की, चॉकलेट, बिस्किटे, सॅल्मन मासे, कॉस्मेटिक वस्तू, वैद्यकीय उत्पादने, लक्झरी कार, मोबाईल, लॅपटॉप, गॅझेट्स, शूज, कपडे आणि फॅशन उत्पादने चामड्याची उत्पादनं स्वस्त होऊ शकतात. याशिवाय यूकेमधून येणाऱ्या दागिन्यांवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने त्यांच्या किमतीही कमी होऊ शकतात.
दुसरीकडे, फक्त भारतच नव्हे तर ब्रिटन मधील लोकांनाही स्वस्तात काही वस्तू मिळणार आहेत. आजही ब्रिटन भारताकडून ११ अब्ज पौंड किमतीच्या वस्तू खरेदी करतो. परंतु करात कपात झाल्यामुळे ब्रिटनमधील लोकांना आणि व्यावसायिकांना भारतीय वस्तू खरेदी करणे आणखी सोपे होईल. यामध्ये चामडे, शूज, ऑटो पार्ट्स, सीफूड, खेळणी आणि कपड्याचा समावेश आहे. या ट्रेड डीलमुळे (India UK FTA) भारतीय उत्पादन, कापड, सागरी आणि दागिने क्षेत्रांना फायदा होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील सागरी उत्पादनांची बाजारपेठ सुमारे ५० हजार कोटींची आहे, जिथे भारतीय उत्पादनांना आता स्पर्धा करणे सोपे जाईल आणि त्यांच्या उत्पादनांची पोहोच वाढवता येईल.




