हैद्राबाद । ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू मायदेशात परतले. या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ऑस्ट्रेलियातून मायदेशी परत येताच सिराज घरी न जाता एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला. तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली. सिराजचे वडील मोहम्मद गौस (Mohammed Ghouse) यांचे २० नोव्हेंबरला निधन झाले. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या सिराजला कोरोना नियमांमुळे वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी भारतात परतता आले नाही.
सिराजचे वडील रिक्षा चालक होते, परंतु त्यांनी मुलांच्या स्वप्नांत परिस्थिती कधीच आड आणली नाही. मुलांच्या स्वप्नांसाठी ते दिवसरात्र मेहनत करत राहिले. हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोहम्मद सिराज मोठा झाला. आपल्या मुलानं देशाचे प्रतिनिधित्व करावं, हे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, परंतु ते स्वप्न सत्यात उतरलेलं त्यांना पाहता आलं नाही. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता.
वडिलांच्या जाण्याचं दुःख मनाशी कवटाळून सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळला आणि प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या गोलंदाजांचे नेतृत्व सांभाळले. त्यानं ब्रिसबेन कसोटीत 5 विकेट्स घेतल्या. या पूर्ण मालिकेत भारताकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला. सामन्यातील प्रत्येक विकेटनंतर सिराज आकाशाच्या दिशेनं दोन्ही हात उंचावून वडिलांना श्रद्धांजली वाहत होता.
सिराजचा भाऊ मोहम्मद इस्माइलनं एक दिवसांपूर्वी सांगितले होते की,”सिराजनं टीम इंडियासाठी कसोटी सामना खेळावे, हे वडिलांचे स्वप्न होते. त्यांना सिराजला निळ्या व पांढऱ्या जर्सीत पाहायचे होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. आम्ही घरात आनंद साजरा केला नाही, परंतु सोसायटी आणि हैदराबाद मध्ये टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला गेला.”
India's hero #Siraj paying homage at the grave of his father Mohd Ghouse who passed away when he was on tour outside the country; the son has returned after fulfilling the father's much cherished dream to see his son play for the country & make it win @ndtv @ndtvindia #MohdSiraj pic.twitter.com/X44GUc2WdX
— Uma Sudhir (@umasudhir) January 21, 2021
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’