मुंबई । इंडियन ऑईल म्हणजेच इंडेन (Indane Gas) गॅसकडून आता आपल्या LPG गॅस धारकांसाठी नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना केवळ एक मिस्ड कॉल देऊन LPG सिलेंडर बुक करता येईल. इंडियन ऑईलकडून नुकतीच यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार आता त्यांच्या ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. (missed call booking facility for LPG gas Cylinders)
तसेच फोनवरुन गॅस बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना आता कॉलसाठी कोणतेही शुल्कही लागणार नाही. सध्याच्या आईवीआरएस (इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. मात्र, आता नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि आईवीआरएस प्रणालीचा वापर करण्यात अडचणी जाणवणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून भुवनेश्वर येथील कार्यक्रमात ‘मिस्ड कॉल’ सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रीमियम ग्रेड पेट्रोल (ऑक्टेन 100) हे उत्पादनही सादर केले. इंडियन ऑईलकडून एक्सपी- 100 ब्रँडअंतर्गत या पेट्रोलची विक्री केली जाईल.
‘या’ नंबरवर द्या मिस्ड कॉल
या मिस कॉल सुविधेसाठी आपल्याला फक्त एक गोष्ट करावी लागेल. रिफिल बुकिंगसाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 8454955555 वर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सिलिंडर बुक झाल्याचा मेसेजे येईल.
सिलिंडरची डिलेव्हरी एका दिवसात कशी होईल, याला प्राधान्य द्या, अशी सूचना धर्मेंद्र प्रधान यांनी कार्यक्रमात केली. 2014 पर्यंत देशभरात फक्त 13 कोटी गॅस कनेक्शन्स होती. मात्र, गेल्या सहा वर्षांमध्ये हा आकडा 30 कोटीपर्यंत पोहोचल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
अॅमेझॉनवरुनही गॅस सिलेंडर करा बुक
सिलेंडर बुक करण्यासाठी अॅमेझॉनवरील LPG कॅटेगरीवर क्लिक करावे. त्याठिकाणी तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा HP गॅसचा 17 अंकी नंबर टाकावा लागेल. यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर एक कर्न्फर्मेसन मेसेज येईल. तो कन्फर्म करताच तुमचा सिलेंडर बुक होईल. याशिवाय, अॅमेझॉन पेमेंटच्या साहाय्याने पैसे अदा केल्यास ग्राहकांना 50 रुपयांची कॅशबॅकही मिळेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’