Indian Railways Achievements 2023 | भारतीय रेल्वे ही सर्व भारतीयांसाठी प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे अनेकजण यास अधिक पसंत करतात. कमी पैशात आरामदायी प्रवास आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असल्याने देशातील सर्वसामान्य प्रवाशी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतो. वाढत्या प्रवाशांमुळे रेल्वे विभाग सुद्धा तुफान फॉर्मात असून याचे फलित म्हणजे 2023 या वर्षात भारतीय रेल्वेने अनेक प्रकारे यश मिळवलं आहे. या कामगिऱ्या नेमक्या कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेऊयात.
कोणत्या केल्या सर्वोच्च कामगिऱ्या? Indian Railways Achievements 2023
1) 1512 मेट्रिक टन मालवाहतूक :
भारतीय रेल्वे ही नेहमी काही ना काही योजना करत असते आणि त्याद्वारे आपली लोकप्रियता वाढवून नवीन विक्रम रचते. त्यातील एक म्हणजे 2022-23 या वर्षात 1512 मेट्रिक टन इतकी सर्वाधिक मालवाहतूक करून रेल्वेने सर्वोच्च कामगिरी केली आहे. जी मागील वर्षी 1418 मेट्रिक टन एवढी होती. म्हणजेच यामध्ये 94 मेट्रिक टनची उल्लेखनीय वाढ पाहायला मिळत आहे. मागील सहा वर्षाचा आकडा पाहिल्यास 2017-18 मध्ये 1161 मेट्रिक टन, 2018-19 मध्ये 1223 मेट्रिक टन, 2019-20 मध्ये 1210 मेट्रिक टन, 2020-21 मध्ये 1233 मेट्रिक टन, 2021-22 मध्ये 1418 मेट्रिक टन आणि 2022-23 मध्ये 1512 मेट्रिक टन एवढा आकडा समोर येतो.
2) उत्तर प्रदेशमध्ये ब्रॉडगेज नेटवर्कचे 100 टक्के केले विद्युतीकरण:
भारतीय रेल्वेच्या या वर्षातील महत्वाच्या कामगिरीपैकी (Indian Railways Achievements 2023) अजून एक कामगिरी म्हणजे रेल्वेने उत्तर प्रदेशमधील ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली. त्यामुळे ही सर्वोच्च कामगिरी पैकी एक आहे. या विद्युतीकरणाच्या पूर्णतेमध्ये सुभागपूर- पचपेरवा BG मार्गासह सर्व ब्रॉडगेज मार्गांचा समावेश होतो. हे यश ईस्ट कोस्ट रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, ईशान्य रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे या सहा प्रमुख रेल्वे झोनमध्ये विस्तारलेले आहे. याशिवाय झांसी- मुझफ्फरपूर- कटनीच्या हायली युटिलाइज्ड नेटवर्क (HUN-5) ने पूर्ण विद्युतीकरण केले आहे.
यामुळे झांशी-लखनौ- बाराबंकी-बुर्हवाल, गोंडा- आनंदनगर- गोरखपूर- वाल्मिकीनगर- सुगौली, मुझफ्फरपूर- बचवारा, नरकटियागंज- रक्सुअल, सीतामढी-दरभंगा- समस्तीपूर, सीतामढ़ी- भान्सीपुर, नारकतियागंज- रक्सुअल, सीतामढ़ी-भांजीपूर अलाहाबाद- माणिकपूर-सतना-कटनी, आणि छपरा-वाराणसी या मार्गांच्या विद्युतीकरणामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या वाढेल अशी अपेक्षा आहे. या प्रयोगामुळे पर्यावरणाला फायदा होणार आहे.
3) देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठीचे टर्मिनल :
देशामध्ये बुलेट ट्रेन आणण्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. ही बुलेट ट्रेन देशात सुरु करण्यासाठी हा प्रकल्प जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक पाठबळाने साकारला जात आहे. ज्यामध्ये सुरुवातीला अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान काम करण्याचे नियोजन आहे. याबाबतचा एक व्हिडीओ केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की “भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी टर्मिनल! साबरमती मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब, अहमदाबाद.” त्यामुळे या वर्षातील सर्वोच्च कामगिरी पैकी एक म्हणजे बुलेट ट्रेनसाठीचे टर्मिनल.
4) रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला-
भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेने रेल्वे बोर्डाच्या सीईओ आणि अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारली आहे. जया वर्मा सिन्हा यांनी या पदाचा स्वीकार केल्यामुळे सर्वोच्च कामगिरी पैकी ही एक कामगिरी भारतीय रेल्वेने केली आहे. जया वर्मा या 1988 मध्ये भारतीय रेल्वेत रुजू झाल्या होत्या. त्यांनी उत्तर- रेल्वे, दक्षिण – पूर्व, तसेच पूर्व रेल्वेच्या विविध पदावर आपले नाव कोरले आहे. शिवाय त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे बोर्डावर ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट सदस्याचे पदही भूषवले होते. त्यांनी 35 वर्षांहुन अधिक वर्ष विविध पदभार सांभाळले आहेत.
5) भारतीय रेल्वेचे ‘गजराज’ AI सॉफ्टवेअर:
भारतीय रेल्वे ही अश्या काही भागातून जाते जिथे हत्तीचा वास आहे. त्यामुळे रेल्वेला पट्रीवर कोण आहे याचा अंदाज न आल्यामुळे अनेक हत्तींचा जीव गेला आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने ‘गजराज ‘ नावाचे AI सॉफ्टवेअर तयार केले. ज्यामुळे हत्ती पट्रीच्या आजूबाजूस असल्यास सायरन वाजून अलर्ट दिला जाईल. ही एक या वर्षातील सर्वोच्च कामगिरी आहे. हे सॉफ्टवेअर अंदाजे 181 कोटी रुपयाचे असून स्वदेशी आहे. या वर्षातील या महत्वाच्या कामगिरीमुळे (Indian Railways Achievements 2023) भारतीय रेल्वेने प्रवाश्यांचा विश्वास अधिकच घट्ट केला आहे. हे नक्की.