हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । मागच्या काही वर्षात भारतीय रेल्वे विभागाचा चांगलाच कायापालट झाला आहे. थेट जम्मू काश्मीर मध्येही रेल्वे धावू लागली आहे. वंदे भारत एक्सप्रेस, नमो भारत ट्रेन, मेट्रो ट्रेन यांसारख्या नव्या गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आल्या आणि प्रवाशांचा प्रवास सोप्पा आणि आरमादायी झाला. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही प्रगतीपथावर आहे. आता रेल्वेच्या ताफ्यात येणार १००० नवीन ट्रेन दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. अश्विनी वैष्णव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आगामी प्रकल्पाची माहिती दिली. यामध्ये १,००० नवीन गाड्या चालवणे, बुलेट ट्रेनचे व्यावसायिक लाँचिंग, सुरक्षा तंत्रज्ञानाचे अपग्रेडेशन आणि मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा ३५% पर्यंत नेणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
अश्विनी वैष्णव म्हणाले, मागच्या ११ वर्षांत केंद्र सरकारने ३५,००० किमी रेल्वे ट्रॅक उभारले आहेत. दरवर्षी ३०,००० वॅगन आणि १,५०० लोकोमोटिव्ह तयार केले जात आहेत. इतर देशांशी तुलना केल्यास हे उत्पादन अमेरिका आणि युरोप पेक्षाही जास्त आहे. २०१४ मध्ये रेल्वेमधील गुंतवणूक २५,००० कोटी होती ती आम्ही २.५२ लाख कोटी रुपयांवर नेली आहे. ज्यामध्ये पीपीपीमधून अतिरिक्त २०,००० कोटी रुपये आले आहेत. तसेच गेल्या दशकात मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा २६% वरून २९% पर्यंत वाढला आहे, तो आता ३०% पेक्षा जास्त आणि ३५% पर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी सरकारने गेल्या दोन वर्षांत २००० सामान्य कोच जोडले आहेत आणि अमृत भारत आणि नमो भारत सारख्या गाड्या सुरू केल्या आहेत. रेल्वे प्रवास (Indian Railways) सर्वसामान्य प्रवाशांना कसा परवडेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. भारतात पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षाही स्वस्त रेल्वे प्रवास आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
बुलेट ट्रेनबाबत काय अपडेट? Indian Railways
यावेळी अश्विनी वैष्णव यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबतही अपडेट दिली. बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील हाय-स्पीड रेल्वेचा (Indian Railways) महत्वाचा टप्पा आहे. जपानी तांत्रिक सहकार्याने कार्यरत असलेला हा प्रकल्प २०२६ पर्यंत ट्रॅकवर येईल आणि २०२७ मध्ये प्रवाशांसाठी सुरु करण्याचं लक्ष्य आहे अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. आयआयटी मद्रास आणि आयआयटी रुरकी या प्रकल्पाच्या डिझाइन आणि संशोधनात सहकार्य करत आहेत. विशेष म्हणजे बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेल्या ४० मीटर लांब गर्डरसारखे जटिल घटक देखील भारतात तयार केले जात आहेत आणि अनेक देशांमध्ये निर्यात देखील केले जात आहेत.