Indian Railways : रेल्वे ठेवणार तुमच्यावर नजर!! तब्बल 74 हजार CCTV बसवणार

Indian Railways CCTV
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ७४,००० प्रवासी कोच आणि १५,००० लोकोमोटिव्हमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. निवडक कोच आणि लोकोमोटिव्हमध्ये यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बऱ्याच काळापासून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे रेल्वेतील गैरप्रकार रोखण्यात येतील अशी आशा रेल्वेला आहे.

कुठे कुठे बसवणार CCTV- Indian Railways

प्रत्येक कोचमध्ये चार डोम -प्रकारचे CCTV कॅमेरे असतील – प्रत्येक प्रवेशद्वारा जवळ दोन कॅमेरे असतील. हे कॅमेरे प्रवाशांच्या कोणत्याही गोपनीयतेला अडथळा न आणता इतर जागा कव्हर करतील. लोकोमोटिव्हमध्ये प्रत्येकी सहा कॅमेरे असतील, जे पुढील, मागील आणि बाजूकडील दृश्यांचे निरीक्षण करण्यासाठी बसवले जातील. रेल्वेत (Indian Railways) बसवले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक विशिष्टतेसह आणि एसटीक्यूसी प्रमाणित असणार आहेत. यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाची उपकरणे वापरण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, १०० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाची चित्रीकरण फीत उपलब्ध होईल, याची खात्री करावी.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की सीसीटीव्ही कव्हरेज संघटित गुन्हेगारी आणि किरकोळ चोरीविरुद्ध प्रतिबंधक म्हणून काम करेल. प्रवास करताना प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेमध्ये अनेकदा चोरीच्या मारामारीच्या घटना घडतात अशा घटनांना सुद्धा या नव्या सीसीटीव्ही सिस्टीम मुळे आळा बसेल. प्रवाशांना शिस्त लागेल.

अपघात रोखण्यासाठी AI ची मदत –

दरम्यान, रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी आता AI ची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी भारतीय रेल्वे (IR) ने मशीन व्हिजन बेस्ड इन्स्पेक्शन सिस्टम (MVIS) बसवण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. एमव्हीआयएस हे रस्त्याच्या कडेला तैनात केलेले एक आधुनिक, एआय/एमएल-आधारित तंत्रज्ञान आहे. हि सिस्टीम धावत्या ट्रेनच्या अंडर-गियरचे HD फोटो काढते आणि कोणतेही लटकलेले, सैल किंवा गहाळ पार्ट ऑटोमॅटिक शोधते. जर काही दोष किंवा तांत्रिक बिघाड आढळला तर ही सिस्टीम रिअल-टाइम अलर्ट पाठवते. MVIS च्या अंमलबजावणीमुळे रेल्वे डब्यांची झीज आणि नुकसान यासाठी मशीन-आधारित तपासणी शक्य होईल. तसेच यामुळे मॅन्युअल तपासणीतील चुका दूर होतील.

रेल्वे बोर्डाचे संचालक सुमित कुमार आणि DFCCIL चे GGM जवाहर लाल यांनी रेल भवन नवी दिल्ली येथे औपचारिकपणे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारांतर्गत, DFCCIL चार MVI युनिट्सची खरेदी, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसाठी जबाबदार असेल. भारतीय रेल्वे विभागात अशा प्रकारची AI सिस्टीम प्रथमच वापरली जाणार आहे. या नव्या AI तंत्रज्ञानामुळे रेल्वे सुरक्षितता वाढेल, आणि संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल अशी आशा आहे.