नवी दिल्ली । वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2021 मध्ये भारतीयांनी 1,899 कोटी रुपयांची चलने भरली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत आपल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की,”गेल्या वर्षी संपूर्ण भारतभर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांसाठी एकूण 1.98 कोटी वाहतूक चलने जारी करण्यात आली होती. यातील 35 टक्क्यांहून जास्त चलने ही दिल्लीत जारी करण्यात आली, जी सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहेत.”
गडकरींनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीने गेल्या वर्षी 71,89,824 चलने जारी केली होती. या प्रकरणात, राष्ट्रीय राजधानीनंतर तामिळनाडू 36,26,037 चलनांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर केरळ 17,41,932 चलनांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सरकारच्या सेंट्रलाइज्ड डेटाबेसनुसार, 1.98 कोटी चलनांपैकी 2021 मध्ये रोड रेज आणि रॅश ड्रायव्हिंगची दोन लाखांहून जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
हे वर्ष प्रवाशांसाठी चांगले नाही. 1 जानेवारी ते 15 मार्च 2022 या कालावधीत देशभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी यापूर्वीच 417 कोटी रुपयांची 40 लाख चलने जारी केली आहेत. यंदा हा आकडा आणखी वाढू शकेल, असे मानले जात आहे.
गडकरी म्हणाले की,”नवीन मोटार वाहन कायद्यापूर्वी, 2017 ते 2019 दरम्यान वाहतुकीच्या उल्लंघनांची संख्या 13,872,098 होती. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 लागू झाल्यानंतर, प्रकरणांची संख्या 48,518,314 झाली.” रस्ता सुरक्षा सुधारणे आणि वाहन चालविण्याचा परवाना जारी करणे आणि उल्लंघनासाठी कठोर दंड आकारणे यासारखे वाहतूक नियम कडक करण्याचे उद्दिष्ट असलेले नवीन विधेयक 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेने मंजूर केले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी या विधेयकाला संमती दिली.
गडकरी म्हणाले की,” त्यांच्या मंत्रालयाने शिक्षण, इंजिनिअरिंग (रस्ता आणि वाहन दोन्ही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन काळजी या आधारे रस्ता सुरक्षेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी बहुआयामी धोरण आखले आहे.”