हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) नजीकच्या भागात औद्योगिक वसाहती तयार करून तिथे उद्योग आणण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. याच पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाच्या 22 इंटरचेंजवर औद्योगिक शहरे उभारण्याचा मोठा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणजे नाशिक येथे उद्योजकांसोबत बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या. या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात फायदा संबंधीत उद्योगाला होईल.
समृद्धी महामार्गांवर सध्या एकूण 22 इंटरचेंज आहेत. ह्या सर्व इंटरचेंजच्या आसपासचा भौगोलिक विचार करून तिथे तश्या प्रकारच्या औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत.यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील उद्योजकांशी बोलून त्यांच्याकडून याबाबत माहिती मागवली जात आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोणत्या प्रकारचे औद्योगिक शहर उभारायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या तालुक्यांमधील तीन इंटरचेंजलगत औद्योगिक शहरे उभारण्याबाबत रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांसह दत्तप्रसाद नडे, श्रीमंत पाटोळे, राजेश कातकर या अधिकाऱ्यांनी निमा हाउस येथे नाशिक येथील उद्योजकांसोबत बैठक घेतली. यावेळी संभाव्य टाऊनशिपचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धोत्रे, अहमदनगर जिल्ह्यातील सावळीविहीर, सिन्नर तालुक्यातील गोंदे, इगतपुरी तालुक्यात घोटीजवळ टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याची माहिती कैलास जाधव यांनी दिली.
समृद्धी महामार्गच्या इंटरचेंज नजीक शिक्षण, पर्यटन, कृषी प्रक्रिया,औद्योगिक, मेडिकल अशा वेगवेगळ्या वसाहती उभारल्या जाणार आहेत. या औद्योगिक शहरांमध्ये एमआयडीसीप्रमाणेच उद्योजकांना जागा दिली जाणार आहे. तसेच पायाभूत सुविधा रस्ते विकास महामंडळच पुरवणार आहे. अशी माहिती मिळत आहे. समृद्धी महामार्गनजीक उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. रोजगारासाठी होणारे स्थलांतरला थोडाफार ब्रेक लागून विकास होणार आहे.
या ठिकाणी होणार औद्योगिक शहरे
यवतमाळ – अमरावती, जालना, शहापूर, एमआयडीसी बुटी बोरी, सिंधी ड्राय पोर्ट, वर्धा, इगतपुरी, आर्वी – पुलगाव, धामणगाव रेल्वे, छत्रपती संभाजी नगर, कारंजा लाड, लासूर, सेलू बाजार, मालेगाव जहांगीर, मेहकर, दुसरबिड, सिंदखेड राजा, शेंद्रा, वेरूळ, वैजापूर, शिर्डी, सिन्नर, नाशिक कनेक्टर