जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून शेतजमिनीच्या दुरूस्तीसाठी 104 वाहनांचा ताफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून शेतजमीनीच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

श्री. सिंह म्हणाले, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील 1732.14 हेक्टर शेतजमिनींचे नुकसान झाले आहे. ही शेतजमिन जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात येणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील 81 गावांमध्ये जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. शेतजमिनीच्या दुरस्तीच्या कामासाठी जेसीबीधारकांना प्रशासनामार्फत मोफत इंधन देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत खंडाळा तालुक्यातील 84 जेसीबी, 10 पोकलेन, 6 डंपर, 4 ट्रॅक्टर या कामासाठी सामाजिक दायित्व म्हणून महाबळेश्वर येथे काम करण्यास तयार झाले आहेत. यासाठी खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांच्या प्रयत्नांमुळे ही यंत्रसामुग्री मिळाली आहे.

या कामांमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतजमिनीची दुरुस्ती होवून त्यांना एक प्रकारे जिल्हा प्रशासनामार्फत दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहे. यातून तेथील शेतकऱ्यांची शेतजमिन पुर्ववत होऊन त्यांची आर्थिक प्रगती होईल. या कामांसाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी दिला आहे. तर या कामासाठी आमदार मकरंद पाटील यांनी सतत पाठपुरावा केला आहे. तसेच प्रांताधिकारी राजेंद्र जाधव व तहसीलदार सुषमा पाटील या सुरु असलेल्या कामांवर लक्ष ठेवून आहेत.