हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नांदेडसह बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथे ‘इनोव्हेशन सेंटर’ (Innovation Center) सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रांद्वारे युवकांना विविध कौशल्यविकास अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी तरुणांना सक्षम करता येणार आहे.
याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी नांदेड जिल्हा दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना ही दिली आहे. अजित पवारांनी सांगितले की, या नवोन्मेष केंद्रांसाठी टाटा कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी कंपनीकडून १६५ कोटींचा निधी देण्यात येणार असून, उर्वरित रक्कम जिल्हा नियोजन मंडळाकडून (DPDC) मंजूर केली जाणार आहे.
युवकांना तंत्रज्ञान क्षेत्रात संधी
या नवोन्मेष केंद्रांद्वारे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील. यातून त्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, असे पवार यांनी सांगितले आहे. याआधी चंद्रपूर, गडचिरोली आणि रत्नागिरी येथेही अशा प्रकारची केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.
‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार
महत्वाचे म्हणजे यावेळी बोलताना अजितपवारांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ही योजना यापुढेही सुरूच राहील. दरम्यान, महायुती सरकारच्या या उपक्रमामुळे राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच, त्यांना आधुनिक कौशल्यांसह तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यास संधी मिळणार आहे.