औरंगाबाद : गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरोधात नाेव्हेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. बनावट कागदपत्र तयार करून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत बंब यांच्यावर आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काल चार महिन्यांनी या प्रकरणात आमदार बंब यांच्यासह काही संचालकांची औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. या प्रकरणात प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना अटक करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदारांकडून वारंवार केली जात होती.
अखेर चार महिन्यांनी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून काल बुधवारी दुपारी आमदार बंब व अन्य काही संचालकांची चौकशी करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी भामरे यांनी त्यांची तीन तासाहून अधिक काळ चौकशी केली. या चौकशीतून काय माहिती समोर आली हे अहवालानंतरच स्पष्ट होईल.