हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या दृष्टीने एक अभिमानास्पद अशी कामगिरी झाली आहे. स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या चौथ्या टप्प्यातील सर्व सागरी चाचण्या रविवारी यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. सर्व उपकरणांची विविध परिस्थिती आणि आव्हानांनुसार चाचणी घेण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाच्या वतीने देण्यात आली.
सर्वप्रथम विक्रांत या एअर क्राफ्टच्या पहिल्या सागरी चाचण्या ऑगस्ट 2021 मध्ये यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दुसरी आणि जानेवारी 2022 मध्ये तिसरी अशा तीन समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या. त्यानंतर आता रविवारी चौथी चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. यामुळे आयएनएस विक्रांत कार्यान्वीत झाल्यानंतर भारतीय हवाई दलाचीही ताकद आणखी वाढणार आहे.
या महिन्याच्या अखेरीस आयएनएसची डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य ठेवले जात आहे. त्यानंतर आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ऑगस्ट 2022 मध्ये ते कार्यान्वितकेले जाईल. कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या माध्यमातून 2 हजार कर्मचाऱ्यांकडून हे जहाज तयार करण्यात आले असून त्याच्याशी संबंधित विविध कंपन्यांमधील 12 हजार लोकांना काम मिळाले. सध्या भारतीय नौदलाकडे आयएनएस विक्रमादित्य ही देशातील एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे.
INS Vikrant ची रचना अशी आहे
अत्याधुनिक रीतीने तयार करण्यात आलेल्या INS विक्रांतमध्ये 14 मजले आहेत. त्याचे वजन 40000 टन असून त्यावर 30 ते 40 विमाने बसवता येतात. त्याच्या लांबीबद्दल बोलायचे तर ते 262 मीटर लांब आणि 59 मीटर उंच आहे. 37,500 टन वजनाची ही विक्रांत युद्धनौका तयार करणारा भारत हा अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्ससह काही निवडक देशांमध्ये सहभागी झाली आहे.