हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर केंद्र सरकारने बोईंग विमानाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ आणि ७८७-९ च्या ताफ्याची सखोल सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे अहमदाबाद विमान अपघात कसा झाला याची चौकशी सुरु असताना, दुसरीकडे पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सरकार विविध उपाय करण्याचा प्रयत्न करतेय. त्याच पार्श्वभूमीवर बोईंग विमानाच्या तपासणीचे निर्देश सरकार कडून देण्यात आले आहेत.
१५ जून २०२५ च्या मध्यरात्री पासून या सूचना लागू होतील. त्यानुसार, उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी बंधनकारक असणार आहे. यामध्ये इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग, केबिन एअर कॉम्प्रेसर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण चाचणी, इंजिन इंधन अॅक्च्युएटर ऑपरेशन, ऑइल सिस्टम आणि हायड्रॉलिक सिस्टमची सेवा तपासणी यांचा समावेश आहे. यासोबतच, टेकऑफपूर्वी पॅरामीटर्सची योग्यरित्या पुनरावलोकन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत,
DGCA चे निर्देश कोणते?
1) 15 जून 2025 पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी बंधनकारक:
2). इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालींची तपासणी
3) केबिन एअर कंप्रेसर आणि संबंधित यंत्रणांची तपासणी
4) इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिम चाचणी
5) इंधन चालित अॅक्युएटर व फ्युएल सिस्टिम तपासणी
6) हायड्रॉलिक प्रणालीची सेवा स्थिती तपासणी
7) टेकऑफ पॅरामीटर्सचा आढावा घेणे
8) ‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ ही प्रणाली तात्पुरत्या कालावधीत दरम्यानच्या तपासणीत समाविष्ट केली जाणार आहे.
9) पॉवर अॅश्युरन्स चेक पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणे आवश्यक.
10) मागील बोईंग ड्रीमलायनर विमानात वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडांचा आढावा घेणे.
राज ठाकरेंनी व्यक्त केली होती शंका –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत बोईंग विमानातील त्रुटींबाबत शंका व्यक्त केली होती. राज ठाकरेंनी म्हंटल, विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या ‘ड्रीमलाईनर’ विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. 2013 ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की 2020 ते 2023 या काळात अनेकदा या विमानांचं उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी 2013 ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे 2013 ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं. जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली ? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान 28 जानेवारी 2014 ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं, असे राज ठाकरेंनी म्हटलं.




