प्रेरणादायी नवदुर्गा : शिक्षिका, मुलगी, गृहणी आणि आई असलेल्या सुवर्णा मुसळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील
नवदुर्गामध्ये आज आपली दुर्गा ही शिक्षण क्षेत्रातील आहे. खरंतर या दुर्गेला घडविणारी तिची आई आज हयात नसली तरी त्या सुध्दा महिलांसाठी प्रेरणादायी दुर्गा आहेत. आपल्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रातील सेवेचे व्रत जोपासत आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारी यशस्वी अशी शिक्षिका, मुलगी, गृहणी आणि आई आहे. गुरूवर्य असलेल्या सुवर्णा मोहन मुसळे (मूळ रा. विंग, ता. कराड, सध्या रा. सर्वोदय काॅलनी, आगाशिवनगर) यांच्या कार्याचा थोडक्यात प्रेरणादायी घेतलेला आढावा.

सुवर्णा मुसळे या 14 वर्षाच्या असताना ऐन तारूण्यात आलेल्या 18 वर्षाच्या तरूण भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर आपणच आता आई- वडिलांचा मुलगा अन् त्यांचा आयुष्यभर सांभाळ करायचा असा निश्चय केला अन् तो पूर्णही केला. वंशाला दिवा हा मुलगाच असतो असे नाही मुलगीही असते, हे त्यांनी जगलेल्या आजपर्यंतच्या आयुष्यातून दाखवून दिले आहे. सुवर्णा मुसळे यांचे चाैथीपर्यंतचे शिक्षण मूळगाव वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे झाले. तेथून पुढे प्रतिकूल परिस्थितीमुळे आजोळी कराड तालुक्यातील विंग येथे कुटुंब आले. विंग येथे भाजीपाल्याचा आईने व्यवसाय केला. पार्वती मोहन मुसळे असे आईचे नांव आहे. आईने अत्यंत खडतरं परिस्थिती मुलीला शिक्षक केले. तेव्हा सुवर्णा मुसळे यांच्या रूपाने त्याही एक दुर्गाच होत्या. तर त्यांचे वडिल मोहन मुसळे हे अध्यात्मिक व्यक्ती होत.

सुवर्णा मुसळे या डीएड् शिक्षण पूर्ण करीत 1985 साली शिक्षक म्हणून वाई येथे रूजू झाल्या. त्यावेळी त्याच्यासोबत वडिल काही दिवस होते. पुढे 1988 साली लग्न झाले. वाई येथे नोकरी करीत असताना बहिणीचेही शिक्षणही तेथे पूर्ण केले. सुवर्णा मुसळे यांचे पती हेही एका कंपनीत कोल्हापूर येथे काम करत. शिक्षिका असलेल्या सुवर्णा मुसळे यांनी 37 वर्षे 2 महिने सेवा केली. यामध्ये वाई येथे 11 वर्षे, कोळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर 18 वर्षे सेवा बजावली. पुढे 9 वर्षे काले, कोळे व तांबवे येथे केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले. जवळपास साडेतीन दशकानंतर आनंदी व समाधानी अशी सेवा बजावत 28 फेब्रुवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्या. आदर्श केंद्रप्रमुख म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

मुलेही यशस्वी मार्गावर
सुवर्णा मुसळे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. आजच्या बदलत्या काळात बदल स्विकारावा लागतो. मुलगी आयटी इंजिनिअर असून पुणे येथे एका मोठ्या कंपनीत असिस्टंट डायरेक्टर (AD) म्हणून काम पाहत आहे. तिला वार्षिक जवळपास 30 ते 32 लाखांचे पॅकेज मिळते. मुलगा डिग्री झाला असून काही दिवसात प्रोजेक्ट मिळेल अन् तोही चांगल्या प्रकारे काम करेल, असा एक अभिमानास्पद आईचे कामही त्यांनी केले आहे.

बायकोने लग्नानंतर नांव नाही बदलले, पतीलाही सॅल्यूट
खरं तर 1988 सालच्या काळ म्हणजे आज जवळपास 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा सुवर्णा मुसळे यांचे लग्न झाले. आपल्या आई- वडिलांना जीवनाच्या शेवटपर्यंत सांभाळ करायचा निश्चय पहिल्यांदाच केला होता. त्यामुळे आपणच वंशाचा दिवा, आई- वडिलांचा मुलगा म्हणून सांभाळ करायचा हे ठरवले होते. त्यामुळे लग्नानंतर आपले नावही आजही तसेच ठेवले आहे. वडिलांचे 2012 साली तर आईचे 2016 साली निधन झाले. या आई- वडिलांना कधीच मुलींने मुलाची कमी भासू दिली नाही. या सर्वात महत्वाचे त्यांचे पतींचेही काैतुक करावे लागेल, कारण एक यशस्वी पत्नी शिक्षिका आपले नांव लावत नाही. तरीही कोणताही कमीपणा किंवा कोणतीही तक्रार न करता साथ दिली.