सातारा | सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी संजोग कदम यांना आंतरराज्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी दि. 5 सप्टेंबर रोजी चिकोडी (बेळगाव) येथे होणार आहे.
सातारा ही आपली जन्मभूमी नसली तरी ती कर्मभूमी आहे आणि नगरपालिका ही मातृसंस्था आहे, या भावनेतून त्या कार्यरत आहेत. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिकेमध्ये त्यांनी विकासाचे पर्व उभे केले. त्यांच्या कार्याची दखल नॅशनल रुलर डेव्हलपमेंट व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेने घेतली आहे. या संस्थेने त्यांना आंतरराज्य गौरव पुरस्काराची घोषणा केली आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा अशा तीन राज्यांमधून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, बांधकाम व इंजिनिअरिंग क्षेत्रामधील कर्तृत्ववान व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. या पुरस्काराची घोषणा संस्थेचे कार्यवाहक माजी खासदार अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली. सौ. माधवी कदम यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.