औरंगाबाद – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असून प्रकरणात संजय शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत विद्यापीठ प्रशासनाने समिती गठित करून सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महानगर मंत्री निकेतन कोठारी यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे.
कामाच्या ठिकाणी महिला व विद्यार्थी यांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा २०१३ व विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम २ मे २०१६ नुसार अंतर्गत तक्रार समितीच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थीनीने तक्रार दिली आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी लागणारी माहिती घेण्यासाठी २७ ऑगस्टला विद्यार्थीनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या दालनात गेली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. परंतु, शिंदे यांनी चेहरा पाहण्यासाठी तिला मास्क काढण्यास सांगितले.
त्यानंतर ३ सप्टेंबरला रात्री १० वाजून ३८ मिनिटांस व्हॉटस ॲपच्या माध्यमातून मॅसेज पाठविले. ‘डियर तु खुप सुंदर आहेस. तु पहिल्या नजरेत आवडलीस. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. असे संवाद साधले. त्यांना मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर बोल ना, तुला राग आला का? असे प्रतिप्रश्न करून नंतर मॅसेज डिलीट केले. यापूर्वीही त्यांनी अनेक मुलींसोबत असे प्रकार केले आहेत. विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यावर करण्यात आलेले आरोप विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणारे आहेत. सदर बाब लक्षात घेता या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली आहे.