कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीपात्रात दि. 17 मे रोजी सन 1961 सालच्या बनावटीचे जिवंत हातबॉम्ब सापडले होते. सदरील बाॅम्ब हे सैन्यदलाने पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ग्रेनेड कोणाला, कशासाठी वितरण केले आहेत याची माहिती सैन्यदलाकडे मागीतली होती. त्यावर लष्करातील अधिकाऱ्यांनी संबंधित हॅण्ड ग्रेनेड 1967-68 साली लष्कराच्या रेकॉर्डवरुन कमी झाले आहेत. ते हवालदार दर्जाचे जवानांना वापरायला दिले होते, मात्र ते कोणाला आणि कधी वाटप केले याची माहिती नसल्याचे पोलिसांना लेखी कळवले आहे. त्यामुळे आता तांबवे कोयना नदीपात्रात सापडलेल्या बाॅम्बचा तपास क्लोज झाल्यात जमा आहे.
कोयना नदीपात्रात मासेमारी करायला तीन युवक दि. 17 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गेले होते. मासे पकडण्यासाठी टाकलेल्या गळाला तीन जिवंत हातबॉम्ब असलेली पिशवी लागली होती. युवकांनी तातडीने हा प्रकार कराड तालुका पोलिस ठाण्यात कळविला होता. त्यानंतर जिल्हा पोलीस दलासह दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथक तांबवे येथील कोयना नदीकाठी दाखल झाले होते. बॉम्बवरील बॅच नंबर हा पोलीस तपासाचा महत्त्वाचा भाग होता. त्यावरून सैन्यदल व खडकी आयुध कारखान्याशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे.
तसेच तपासाच्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व कर्मचारी तेथे जाऊन आले होते. तसेच याच्या तपासासाठी पोलिसांनी कराड तालुक्यातील सैन्यदलातून निवृत्त झालेल्यांची यादी तयार करत चौकशी सुरू केली होती. हॅण्ड ग्रेनेड लष्करी फॅक्टरी बनावटीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची माहिती सैन्यदलाकडे पोलिसांनी मागीतली होती. त्यानुसार सैन्यदलाने माहिती घेतली असता त्यांच्या ती उपलब्ध नसल्याने समोर आले आहे.