आयपीएल सट्टाबाजार ः व्हॉट्सॲपद्वारे सट्टा घेणाऱ्या 12 जणांवर गुन्हा, तीन जणांना अटक

IPL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण शहरात आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. सट्टाबाजाराचे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करताना १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आयपीएल सामन्यावर व्हॉट्सॲपद्वारे सट्टा घेत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, फलटण शहर पोलिसानी गुरुवार, दि. २९ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खंडोबा मंदिराशेजारी मलटण-फलटण येथे जयकुमार पवार यांच्या दुमजली घरात पहिल्या मजल्यावर मोबाइलवर तसेच रोख स्वरूपात पैसे स्वीकारून आयपीएल क्रिकेट सामन्यावर तसेच मटका घेताना जयकुमार शंकरराव पवार (रा.मलटण-फलटण), वैभव सुनील जानकर (रा. शुक्रवार पेठ फलटण) यांना पकडले.

चौकशीअंती व्हॉट्सॲपद्वारे त्यांनी अमर पिसाळ (रा. मारवाड पेठ फलटण), दत्ता कुंभार (रा. वीटभट्टी जवळमलटण फलटण), सुमित चोरमले (रा. धनगरवाडा, बुधवार पेठ, फलटण), अमित कुरकुटे (रा. उमाजी नाईक, चौक फलटण), अमोल काळे (रा. दत्तनगर, फलटण), संतोष काळे (रा. लक्ष्मीनगर, फलटण), जेबले (पूर्ण नाव माहीत नाही. शंकर मार्केट फलटण), शौकत यासीन शेख (रा. बिरदेवनगर, फलटण), नटराज क्षीरसागर (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांच्याकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा तसेच मटका घेतल्याने या आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुणे येथील शशांक प्रशांत लांडे याच्यावरही गुन्हा नोंदविला आहे. आत्तापर्यंत जयकुमार पवार, वैभव जानकर, शौकत शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊळ करीत आहेत.