मुंबई- चेन्नईसाठी ‘करो या मरो’ मुकाबला; रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

MI VS CSK
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. एकेकाळी आयपीएल वर आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या या दोन्ही संघांनी यंदा आपला फॉर्म गमावला असून आयपीएल पॉइंट टेबल मध्ये दोन्ही संघ तळाला आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स साठी आजचा सामना म्हणजे करो वा मरो असाच असणार आहे.

5 वेळचे आयपीएलचे चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नसून आत्तापर्यंत खेळलेल्या सहाही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म ही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितने मोठी खेळी करावी अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहेत. तसेच मुंबईला कोणत्याही परिस्थितीत आज जिंकायचं असेल तर अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराज, सलामीवीर ईशान किशन यांना साजेशा खेळ करावाच लागेल.

तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सची परिस्थिती काय वेगळी नाही. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात 1 विजय मिळवला आहे. महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदा वरुन पायउतार झाल्यानंतर प्रथमच चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपवले आहे. परंतु जडेजाला अद्याप आपली छाप पाडता आली नाही. सुमार गोलंदाजी ही चेन्नईसाठी विचार करण्याची गोष्ट आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाडला मागील सामन्यात फॉर्म सापडल्याने चेन्नईला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आजच्या या महामुकाबल्यात चेन्नई बाजी मारणार की मुंबई हा सामना जिंकून स्पर्धेत आपलं स्थान कायम राखणार यांकडे सर्वांचे लक्ष आहे.