तेहरान । इराणचे टॉप लष्करी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरोधात इराणने अटक वॉरंट जारी केले आहे. इराकच्या बगदाद शहरात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांना पकडण्यासाठी इराणने इंटरपोलकडे मदत मागितली आहे. ट्रम्प आणि इतर अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी इंटरपोलला नोटीस काढण्याची विनंती केली आहे.
तेहरान सरकारी वकील अली अलकसिमेर यांनी सांगितले की, ट्रम्प आणि अन्य ३० हून अधिक जणांनी ३ जानेवारी रोजी सुलेमानी यांच्यावर ड्रोन हल्ला केला. या प्रकरणातील त्यांचा सहभाग असल्याचा इराण सरकारचा आरोप आहे. ट्रम्प यांच्यासह इतरांवर हत्या करणे आणि दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे. ट्रम्प यांच्याशिवाय अन्य आरोपींबाबत कोणाचेही नाव सरकारी वकील अली यांनी जाहीर केले नाही. ट्रम्प यांची अध्यक्षीपदाची मुदत संपल्यानंतरही त्यांच्याविरोधात खटला सुरुच ठेवणार असल्याचे अली अलकासीमहर यांनी सांगितले.
इराण सरकारने डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य आरोपींविरोधात उच्चस्तरीय रेड नोटीस काढण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. मात्र, इंटरपोलने याबाबत काहीही भाष्य केले नाही. इंटरपोलच्या नियमानुसार, राजकीय कृतीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत इंटरपोल सहभागी होऊ शकत नाही. इंटरपोल लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला इराणने रिवोल्यूशनरी गार्डचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांची गुप्त माहिती अमेरिका आणि इस्राएलला देणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे इराण सरकारने जाहीर केले होते. ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाल्यानंतर इराणने याचा सूड घेण्याचा जाहीर केले होते. त्याशिवाय, इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. या तणावातूनच इराणकडून युक्रेनचे प्रवासी विमान पाडले गेले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”