टीम हॅलो महाराष्ट्र। इराकमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दोन लष्करी हवाईतळावर इराणने हल्ला केला आहे. पेंटागॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचं इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आलं आहे.
इराणने इराकमधील इरबिल, अल असद आणि ताजी या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करताना तब्बल १२ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. इराणच्या ‘इस्लामिक रीव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीसी) फौजांनी क्षेपणास्त्रडा गल्याचे वृत्त इराणच्या सरकारी वाहिनीने दिले आहे. अशाप्रकारचे आणखी हल्लेही केले जातील, असा इशाराही आयआरजीसीने अमेरिकेला दिला आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी कोणत्याही शेजारी देशाने अमेरिकी फौजांना भूमी उपलब्ध करून दिल्यास त्या देशालाही लक्ष्य करण्यात येईल, असा इशाराही आयआरजीसीने दिला आहे.
अमेरिकेने बगदाद येथील विमानतळाबाहेर शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या फौजांचे टॉप कमांडर मेजर जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इराण विरुद्ध अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने इराकमधील अमेरिकी दूतावास तसेच हवाईतळाला लक्ष्य केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकेच्या मालकीच्या हवाईतळावर मोठा हल्ला इराणने चढवला आहे.दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झाले आहेत.
USA civil flights banned over the Gulf, Iraq and Iran: AFP news agency https://t.co/m7MdxD85pf
— ANI (@ANI) January 8, 2020