मुंबई । बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या पार्थिवावर अंधेरीतील यारी रोड, वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. इरफानच्या पार्थिवाला सुपुर्द-ए-खाक करताना सिनेसृष्टीतील फार मोजकी मंडळी उपस्थित होती. मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात इरफानच्या पार्थिवाला दफन करण्यात आलं. लॉकडाउनच्या परिस्थितीत फार कमी लोकांना इरफान यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. चाहते, मीडिया आणि सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही व्यक्तीला गर्दी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली नाही.
इरफान खानसोबत बरेच चित्रपट साकारणारे दिग्दर्शक विशाल भारद्वाज, गायक मिका सिंग, कॉमेडियन कपिल शर्मा असे मोजके सेलिब्रिटी अंत्यसंस्कारांवेळी उपस्थित होते. याशिवाय इरफान राहत असलेल्या इमारतीतील त्यांचे शेजारील काही उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानभूमीत कुटुंबातील फक्त ५ जणांना आत येण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी त्यांची दोन्ही मुलं बाबिल आणि अयान उपस्थित होते. इरफानचे सर्वात जवळचा मित्र दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया इरफानच्या कुटुंबासोबत रुग्णालयापासून त्याच्या दफनविधी पर्यंत उपस्थित होता.
गेल्या काही वर्षांपासून इरफान आजारी आहे. २०१७ मध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी तो परदेशात गेला होता. याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली होती. गेल्या वर्षी २०१९ मध्ये तो भारतात परतलाही. भारतात आल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. मात्र पुन्हा दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली अन् कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात इरफानला दाखल करण्यात आलं. पण आज बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. इरफान खान यांना न्यूरोएण्डोक्राइन ट्यूमरचा आजार होता. या आजारानच वयाच्या ५३ व्या वर्षी इरफानची प्राणज्योत मालवली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”