हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार मनेका गांधी यांनी इस्कॉन संस्थेवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी, “इस्कॉन गोशाळेतील गाईंना कत्तलखान्यात विकते.” असा खळबळजनक दावा केला होता. या सर्व घटनेनंतर आता इस्कॉनने मनेका गांधी यांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. ज्यावेळी मनेका गांधी यांनी हे आरोप केले होते तेव्हाच हे सर्व आरोप खोटे असल्याचे इस्कॉनचे राष्ट्रीय प्रवक्ता युधीष्ठीर गोविंदा दास यांनी म्हणले होते. त्यानंतर आता इस्कॉनकडून मनेका गांधींवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती देताना इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी म्हटले आहे की, “इस्कॉनवर पूर्णपणे निराधार आरोप लावल्याबद्दल मनेका गांधी यांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस आम्ही आज पाठवली आहे. इस्कॉनचे भक्त, समर्थक आणि हितचिंतक यांचा जगभरातील समुदाय या बदनामीकारक, निंदनीय आरोपांमुळे अत्यंत दु:खी झाला आहे. इस्कॉनविरोधातील खोट्या प्रचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही” त्यामुळे इस्कॉनने केलेल्या कारवाईने मनेका गांधी यांच्या अडचणीत वाढ केली आहे.
मनेका गांधी यांनी काय म्हटले होते?
खासदार मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्या इस्कॉनवर गंभीर आरोप करताना दिसत होत्या. मनेका गांधी यांनी म्हटले होते की, “देशातील सर्वात मोठे विश्वासघाती कोणी असेल तर ते इस्कॉन आहे. ही संस्था गोशाळेतील गाईंना कत्तलखान्यात विकते. मी अलीकडेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील गोशाळेत गेली होते. इस्कॉनकडून या गोशाळेच संचालन केलं जातं. तिथे गायींचा अवस्था खूपच खराब होती. गोशाळेत एकही बछडा नव्हता. याचा अर्थ ते गायी विकून टाकतात”