पुणे प्रतिनिधी : मामी – मुंबई फिल्म फेस्टीवलअंतर्गत ‘फिल्म्ड ऑन आयफोन’ या उपक्रमाअंतर्गत आयफोनवर चित्रपट शूट करण्यासाठी ॲपल कंपनीकडून फिल्ममेकर्सना अनुदान दिले जाते. यंदा एप्रिल महिन्यात होणाऱ्या मामी फेस्टीवलसाठी देशभरातून चार दिग्दर्शकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी एक असलेल्या मल्याळम भाषेतील ‘कोवार्टी’ या लघुपटासाठी संदिप माने यांच्या अथांग स्टुडिओजने ॲपल कंपनीसोबत सहनिर्मिती केली आहे.
इस्लामपूरच्या मातीत घडलेल्या संदिप माने (Sandeep Mane) या तरूणाने 2011 मध्ये प्रिझम या शॉर्टफिल्मद्वारे दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांची प्रभारंग फिल्म्स ही संस्था शासकीय जाहिरात यादीत नोंदणीकृत असून त्यांनी शासनाच्या वेगवेगळ्या विभागांसाठी जाहिराती व कॅम्पेन केल्या आहेत. अथांग स्टुडिओज ही त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी सुरू केलेली संस्था असून अथांग स्टुडिओजचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या निमित्ताने मराठी पाऊल मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत पडले आहे.
ब्लॅक वॉरंट, सॅक्रेड गेम्स या वेब सिरीजसह 2024 या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहीन रवींद्रन यांनी कोवार्टीचे दिग्दर्शन केले आहे. मल्याळम इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेजिषा विजयन हिने यामध्ये प्रमुख भूमिका साकारली असून सुपरहिरोज ऑफ मालेगाव, न्यूटन, बधाई हो आदी चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी करणारे स्वप्निल सोनवणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. केरळमधील अलेप्पी इथे नुकतेच लघुपटाचे शूटींग पूर्ण झाले असून मल्याळम इंडस्ट्रीतील नामांकित तंत्रज्ञांचा यामध्ये सहभाग आहे. संदिप माने यांच्या मराठी चित्रपटाचे कामही सुरू असून लवकरच शूटींग सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.