हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जॉब मार्केटमध्ये गेल्यानंतर अनुभवी व्यक्तींना सहजरीत्या नोकरी मिळून जाते. मात्र नवीन अनुभवामुळे फ्रेशर्सला मार्केटमध्ये लवकर स्थान दिले जात नाही. मात्र आता सर्व फ्रेशर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील नामांकित आयटी कंपन्या जुलै-डिसेंबर या कालावधीत 50,000 जागांसाठी फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहेत. यामध्ये नॉन – आयटी कंपन्यांचा देखील समावेश असेल जे फक्त फ्रेशर्स लोकांची कंपनीमध्ये भरती करेल. यामुळे फ्रेशर्स व्यक्तींचा जॉब शोधण्याचा प्रश्न मिटणार आहे. याबाबतची माहिती टीमलीज एडटेक प्लेटफॉर्मने दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, IT उद्योगात मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन होताना दिसत आहे. त्यामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सेफ्टी आणि इतर प्रगत तंत्रज्ञानामध्ये नवीन नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. या संदर्भात टीमलीजने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे की, आयटी कंपन्या येत्या काळात 73 टक्के पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करेल. यातील 65 टक्के पदांवर फ्रेशर्सची नियुक्ती करण्यात येईल. यामध्ये, टेक स्टार्ट-अप, दूरसंचार, अभियांत्रिकी क्षेत्रांचा समावेश असेल. तसेच, चार्टर्ड अकाउंटंट, SEO, UX डिझायनर अशा पदांसाठी देखील फ्रेशर्सची नियुक्ती करण्यात येईल.
त्याचबरोबर, या सर्व फ्रेशर्सला योग्य मानधन देखील कंपनीकडून देण्यात येईल. मुख्य म्हणजे, भविष्यात आयटी क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात देखील नोकरीचे संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स, टेलिकॉम, फार्मास्युटिकल्स अशा इतर क्षेत्रांमध्ये फ्रेशर्सला नोकरी मिळेल. सध्या अनेक परदेशी कंपन्या भारतातील IT क्षेत्रात मोठी गुंतवणूक करताना दिसत आहेत. यामुळे कंपन्यांच्या कामाचा व्याप देखील वाढला आहे. भारतात विदेशी कंपन्या आणत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे विविध क्षेत्रात 20,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
तसेच दूरसंचार बाजारपेठेत 1,000 पेक्षा जास्त नोकरीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, ऑपरेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, क्लाउड तंत्रज्ञान, डेटा सायन्स यांसारख्या इतर विभागात 5,000 हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भविष्यात फ्रेशरसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याचा फायदा भारतातील तरूण वर्गाला होऊ शकतो. तसेच, बेरोजगारीच्या प्रमाणात देखील काही प्रमाणात घट होऊ शकते.