पेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत हवा मारुन मिळाली नाही तर ‘अशी’ करा तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कायद्याचं बोला #४ | अॅड. स्नेहल जाधव

पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता. पण याच पेट्रोलपंपावर आपल्यासाठी अनेक सुविधा देण्यात येतात आणि त्या देणं पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असतं. चला तर मग पाहूयात कुठल्या आहेत या सुविधा?…

इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमसोबतच सर्व तेल कंपन्यांनी या सुविधांसंदर्भात एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पेट्रोल पंपावर तुम्हाला मिळणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला या सुविधा पेट्रोल पंपावर मिळाल्या नाहीत तर तुम्ही त्याची तक्रारही करु शकता.

१) मोफत हवा:
अनिवार्य सुविधांचा विचार केला तर यामध्ये सर्वप्रथम येते हवा. ज्यावेळी तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता त्यावेळी तुम्ही गाडीत मोफत हवा भरु शकता. पेट्रोल पंप चालकांना अशी सुविधा पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांसाठी करायची असते.

२) पाण्याची व्यवस्था : 
प्रत्येक पेट्रोल पंपावर पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रवासा दरम्यान तुम्ही पेट्रोल पंपावर पाणी घेऊ शकता.

३) तक्रार पुस्तिका:
पेट्रोल पंपावर तक्रार पुस्तिका असणं गरजेचं आहे. जर पेट्रोल पंपावर एखाद्या कर्मचाऱ्यासंदर्भात किंवा सुविधेसंदर्भात तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही त्या नोंदवहीत करु शकता.

४) काम करण्याची वेळ:
पेट्रोल पंपावर किती तास काम केलं जातं याची माहितीही प्रमुख रुपात डिस्प्ले करणं आवश्यक आहे. त्यासोबतच कंपनीच्या अधिकाऱ्यांचा फोन नंबरही असणं आवश्यक आहे. म्हणजेच गरज पडल्यास ग्राहक त्या क्रमांकावर संपर्क करु शकतील.

५) आपत्कालीन फोन (Emergency Phone Call):
दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना अगदी अनपेक्षितपणे घडत असतात. जर कधी तुमचा अपघात झाला आणि तुम्हाला कोणाला निरोप द्यायचा असेल आणि जवळपास कोणी नसेल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन आपत्कालीन फोन अगदी हक्काने करू शकता तोही अगदी मोफत.
अपघातच नाही तर प्रवास करताना तुमच्या मोबाईलची बॅटरी कधी संपली किंवा तुम्हाला इतर अगदी महत्वाचा निरोप पोहोचवायचा आहे अशा प्रसंगी तुम्ही एक ग्राहक म्हणून पेट्रोल पंपावर जाऊन अगदी मोफत आणि हक्काने हा फोन करू शकता.

६) फर्स्ट एड बॉक्स:
तुम्हाला प्रत्येक पेट्रोल पंपावर फर्स्ट एड बॉक्स मिळेल. प्रवासादरम्यान तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या फर्स्ट एड बॉक्सच्या मदतीने प्रथमोपचार करु शकता.

७) शौचालय आणि सुरक्षा:
पेट्रोल पंपावर शौचालयाची सुविधा असणं आवश्यक आहे. इतकेच नाही तर, एखाद्या संकटाच्या काळात परिस्थिती हाताळता यावी यासाठी पेट्रोल पंपावर सुरक्षेची सुविधा देखील आवश्यक असावी.

पेट्रोल पंपाविरूद्ध तक्रार कोठे करावी :
वरीलपैकी कोणत्याही सुविधा पेट्रोल पंपांवर विनाशुल्क दिल्या जात नसतील किंवा त्यासाठी पैसे आकारले जात असतील तर आपण पेट्रोल पंप मालकाविरूद्ध तक्रार करू शकता. ही तक्रार सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीवेंस रिड्रेस एंड मॉनिटरिंग सिस्टम च्या पोर्टल वर म्हणजेच pgportal.gov  वर करू शकता.
याशिवाय तत्सम पेट्रोल पंप ज्या पेट्रोलियम कंपनीचा असेल त्या कंपनीकडेही तक्रार करू शकता. यासाठी संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या संकेतस्थळावर ईमेल आयडी व संपर्क क्रमांक मिळू शकेल.

– अॅड स्नेहल जाधव