मुंबई । भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव म्हणून स्थान मिळाल्याबद्दल भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त करत केंद्रीय नेत्यांचे आभार मानत ‘हा माझा सन्मान आहे,’ असल्याचे ट्वीट त्यांनी केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाने दिलेल्या नव्या जबाबदारीबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्यावर पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच, आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नड्डा यांचेही आभार मानले आहेत.
Thanking all party Central Leaders Hon PM Shri @narendramodi ji, Home Minister Shri @Amitshaha ji for believing in me and our National President Shri @JPNadda ji for including me in his team.
It's an honour for me.. @blsanthosh ji, @v_shrivsatish ji.— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 26, 2020
गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे यांना कोणती जबाबदारी मिळणार याची सतत चर्चा होती. त्या नाराज असल्याचंही बोललं जात होतं. विधान परिषदेवर संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, तसं झालं नाही. पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्याचवेळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असल्याचं सुतोवाच केलं होतं. त्यानुसार त्यांना ही संधी मिळाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.