Jalgaon Nanded New Railway Line : महाराष्ट्राला मिळणार नवा रेल्वे मार्ग; 174 KM अंतर, 17 स्थानके

Jalgaon Nanded New Railway Line
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jalgaon Nanded New Railway Line । मागच्या काही वर्षात महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठा कायापालट झाला आहे. अनेक जिल्ह्यात नवीन रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे मार्ग उभारले जात आहेत. यामुळे राज्यातील वाहतूक आणि दळणवळणाला चांगली गती मिळाली आहे. आता आणखी एक नवा रेल्वे मार्ग आपल्या राज्याला मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग १७४ किलोमीटर लांबीचा असून तो जळगाव आणि जालना या २ जिल्ह्याना जोडेल. या नव्या रेल्वेमार्गामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल.

या रेल्वेमार्गासाठी ७ हजार १०५ कोटी ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी राज्य सरकारने यापूर्वीच ५० टक्के खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तर केंद्र सरकारने १० ऑगस्ट २०२४ रोजी यास मंजुरी दिली आहे. यापैकी जालना जिल्ह्यात पाच हजार कोटी रुपये खर्च होतील. यातील चार हजार कोटी प्रत्यक्ष बांधकाम तर एक हजार कोटी रुपये भूसंपादनावर खर्च होतील. जालना ते जळगाव रेल्वे मार्ग 174 किलोमीटर लांबीचा राहणार असून या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी (Jalgaon Nanded New Railway Line) भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याआधीच एक महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बदनापूर तालुक्यातील दावळवाडी, खादगाव आणि नजीकपांगरी या तीन गावांमध्ये जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. तसेच बदनापूर तालुक्यातील मांडवा गावात जमिनीची मोजणी सुरू झाली आहे. यामुळे लवकरच तालुक्यातील सर्व गावांमधील जमिनीची मोजणी पूर्ण होणार आहे.

17 नवीन रेल्वे स्थानक निर्माण केली जाणार – Jalgaon Nanded New Railway Line

प्रशासनाने या प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. ड्रोन सर्वेक्षणाच्या मदतीने प्रशासनाकडून या प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमिनीची, शेतीची, फळबागांची, विहिरींची तसेच इतर मालमत्तांची माहिती गोळा करण्यात आली आहे. या नव्या रेल्वेमार्गावर एकूण 17 नवीन रेल्वे स्थानक निर्माण केली जाणार आहेत. यामध्ये नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सायगांव, केदारखेड, राजूर, बवणेपंगरी, पिंपळगाव, नागेवाडी, दिनागाव या स्थानकांचा समावेश असेल. तसेच 174 किलोमीटर लांबीच्या या मार्गात एकूण 130 छोटे पूल तयार होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे ३ नद्यांवर मोठे पूल आणि ३ बोगदे उभारले जाणार आहेत.

सध्याच्या परिस्थितीत जळगावहून रेल्वेने जालनाकडे जाण्यासाठी मनमाडमार्गे फेऱ्याने जावे लागते, जळगाव-जालना व्हाया मनमाड ३३६ किलोमीटर अंतर आहे. परंतु नवीन जळगाव नांदेड रेल्वे मार्ग सुरु झाल्यास फक्त १७४ किलोमीटर एवढाच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.