भोकरदन ते घनसावंगी…. जालना जिल्ह्यात ‘हे’ 5 चेहरे आमदार असतील

jalna politics
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलनाचा सेंटर पाँइंट ठरलेला जालना जिल्हा… ज्यांची गाडी राजकारणात नॉन स्टॉप चालली होती त्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना याची झळ बसली आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून काँग्रेसचे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाले… राजकारणातील पहिल्या फळीत राहीलेल्या नेत्यांसाठी जालना जिल्हा हा इपिसेंटर राहीलाय… दानवेंच्या मुलालाच आपल्या वडीलांना लीड मिळवून देता आलं नाही त्या भोकरदन विधानसभेपासून राजेश टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघापर्यंत यंदा नेमकं कोण निवडून येऊ शकतं? जिल्ह्यातील कोणते पाच आमदार सध्या आमदारकीच्या गुलालाच्या अगदी क्लोज आहेत? लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जालन्यात मराठा फॅक्टर वर्क आऊट होईल का? महायुतीच्या बाजूने राजकारण झुकलेल्या जालन्याला आमदारकीला महाविकास आघाडी सुरुंग लावेल का? त्याचंच केलेलं हे इनडेप्थ एनालिसीस…

यातला पहिला मतदारसंघ पाहुयात तो परतुरचा… वादग्रस्त पण बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे बबनराव लोणीकर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत… शेकाप, काँग्रेस असा प्रवास होत 1999 ला भाजपच्या बबनराव लोणकरांनी या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारकी पटकावली…2004 ला ही त्यांनी आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली… 2009 ला मात्र अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूरची आमदारकी हातात घेतली.. पुढे जाऊन जेथलिया हे काँग्रेसमध्ये गेले… पण पुन्हा एकदा 2014 आणि 2019 अशा सलग दोन टर्म काँग्रेसच्या जेथलियांना पराभूत करून लोणीकरांनी परतुरवर भाजपचा झेंडा फडकवत ठेवला…

भाजप मंत्रिमंडळाच्या पहिल्याच टर्ममध्ये पाणीपुरवठा मंत्रीपद त्यांच्या वाट्याला आलं होतं… त्यात केलेली विकासकामं, मोदींची लाट आणि युतीची ताकद सोबत असल्यानं लोणकरांचा विजय सोपा झाला… पण चालू असणारी टर्म ही लोणीकरांच्या पॉलिटिकल इमेजवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गेली… तहसीलदार मॅडमना हिरोईन म्हणणं, बनावट पदवी, आयपीएस अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी, राजेश टोपे यांच्यावरील वायरल झालेला शिवीगाळ करतानाचा ऑडिओ आणि स्वतःच्या मुलाला राजकारणात लॉन्च करण्यासाठी सुरू असणारी धडपड पाहता यंदाची विधानसभा लोणीकरांना जड जाऊ शकते… इथं परंपरेप्रमाणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असल्यानं लोणीकर आणि जेथलिया यांच्यातला सामनाच मुख्यतः परतुरकरांना पाहायला मिळेल… सुरेश कुमार जेथलिया यांनी मतदारसंघातील गाठीभेटी, दौरे आणि बैठका सुरू केल्यानं यंदा शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी जेथलियांच्या पाठीशी राहिली तर इथे दिग्गज बबनराव लोणीकरांना पराभवाचा दणका बसू शकतो… फक्त लोकसभेसाठी घोड्यावर बसलेल्या त्यांच्या चिरंजीवांना म्हणजेच राहुल लोणीकरांना ते विधानसभेच्या मैदानात उतरवतील का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे..

दुसरा मतदारसंघ येतो तो भोकरदनचा… ग्रामपंचायत सदस्यांपासून केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात रावसाहेब दानवे यांनी आपला प्रभाव या मतदारसंघावर कायम ठेवलाय. भोकरदन मतदारसंघात आणि राज्याच्या राजकारणात 40 वर्ष राबलेल्या दानवेंचा संघर्ष हाच या मतदारसंघाचा इतिहास झालाय, त्यामुळे भोकरदन म्हणजे दानवेंचा राजकीय बालेकिल्ला असं म्हटलं जातं.. आणि त्याला दानवेंनी सार्थही करुन दाखवलंय… भोकरदनच्या आमदारकीसाठी इथं पाहायला मिळणारा संघर्ष आहे तो दानवे विरुद्ध दानवे असा.. चंद्रकांत दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे हे भोकरदनच्या प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहत आले… 2009 साली रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना विधासभेच्या रिंगणात उतरवले यावेळी भाजपकडून निर्मला दानवे आणि राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे असा सामना झाला. यात निर्मला दानवे यांचा 1 हजार 639 मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी हा गड आपल्याच ताब्यात ठेवत रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला हादरा दिला.

2014 मध्ये मात्र भोकरदन विधासभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलाला विधासभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. यावेळी खासदार रावसाहेव दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे असा सामना रंगला. या लढतीत भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा 6 हजार 750 मतांनी विजय झाला. यावेळी विधालसभेचा गड आपल्याकडे खेचण्यात दानवे पिता पुत्राला यश आलं.. यानंतर संतोष दानवे यांनी पुन्हा चंद्रकांत दानवेंना धूळ चारत २०१९ ची आमदारकी राखली… आपल्या वडीलांना भोकरदनमधून लोकसभेला मोठं लीड मिळवून द्यायचं तर दुसरीकडे पितापुत्रांनी मिळून भोकरदनची आमदारकी आरामात काढायची… दानवेंचं राजकारण असं मस्त – मजेत चाललं होतं… पण याला ब्रेक लागल तो यंदाच्या लोकसभेला… मराठा आरक्षणाचा जालना सेंटर पाँइंट असल्यानं त्याची झळ दानवेंना बसली.. खासदारकीला ते पडले.. पण सगळ्यात वाईट होतं ते त्यांच्या मुलाच्या म्हणजेच भोकरदन या विधानसभेतूनच दानवे पीछाडीवर होते.. थोडक्यात वडिलांच्या खासदारकीनंतर आता मुलाची आमदारकीही सध्या धोक्यात दिसतेय… त्यामुळे परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेैस शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवे विरुद्ध भाजपकडून संतोष दानवे असाच यंदाचाही सामना होणार असला तरी यंदा राष्ट्रवादीची तुतारी भोकरदन मध्ये वाजण्याचे जास्त चान्सेस असल्याचं बोललं जातंय…

तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे जालना विधानसभेचा… बियाणांची पंढरी आणि किंग ऑफ स्टील सिटी अशी जागतिक पातळीवर ओळख असलेले हे शहर… 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या सलग सहा निवडणुकींपैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि चार वेळेस शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले… २०१४ ला खोतकर अवघं २९४ मतांच्या लीडने निवडून आले होते.. पण २०१९ ला युती होऊनही खोतकरांचा गेम झाला आणि गोरंट्याल निवडून आले… तेव्हापासून शिवसेनेचं सरकार सत्तेत असूनही खोतकरांसारखा मोठा नेता सत्तेत नव्हता. याचा त्यांच्या पाॅलिटीकल करिअरला मोठा सेटबॅक बसला… यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेलाही काँग्रेसच्या उमेदवाराला ९७९० मतांची मिळालेली आघाडी पाहता हाच ट्रेंड विधानसभेलाही कायम राहीला तर पुन्हा एकदा गोरंट्याल जालन्यातून विजयाचा गुलाल लावतील, असा सध्या इथला ट्रेंड दिसतोय..

चौथा मतदारसंघ येतो तो घनसावंगीचा… घनसावंगी मतदारसंघ आस्तिवात येण्याअगोदरपासून म्हणजे 1999 पासून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांचा बालेकिल्ला राहीलाय… टोपेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे अनेक प्रयत्न झाले पण कुणालाही यात यश आलं नाही… शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी अशा या मतदारसंघातील नेहमीच्या लढतीत हिकमत उढाण हे टोपेंना शिवसेनेकडून आव्हान देत असतात.. पण प्रत्येक वेळेस ते इथून पराभूत होत असतात… सध्या हिकमत उढाण हे ठाकरे गटात आल्याने आता विधानसभेसाठी उढाण शिंदे गटात जातील, अशी जोरदार चर्चा आहे.. त्यामुळे धनुष्यबाण विरुद्ध तुतारी अशा पहायला मिळणाऱ्या लढतीत यंदाही घनसावंगीचं वारं टोपेंच्या बाजूने झुकलेलं आहे, असं दिसतंय..

पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो बदनापूरचा…जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड या चार तालुक्यातील गावांचा मिळून बनलेला हा बदनापूर मतदारसंघ… २००९ ला हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला.. यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे संतोष सांबरे निवडून आले.. पण २०१४ ला युती आणि आघाडी स्वतंत्र लढल्याने शिवसेनेच्या सांबरेंचा पराभव होऊन भाजपचे नारायण कुचे निवडून आले… २०१९ लाही राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांना धोबीपछाड देत पुन्हा एकदा भाजपच्याच नारायण कुचे यांनी मैदान मारलं.. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रावसाहेब दानवे हे याच बदनापूर मतदारसंघातून खुप पिछाडीवर फेकले गेलेत… त्यामुळे बदनापूर विधानसभेच्या निकालाचा कल यंदा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलाय, असं म्हणायला हरकत नाही.. त्यात संतोष सांबारे यांनी शिवसेनेच्या फुटीत ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार केल्यामुळे यंदा महाविकास आघाडीकडून ते विधानसभेच्या रिंगणात दिसतील, हे स्पष्ट आहे…

शरद पवार गटाकडून बबलू चौधरीही इच्छुकांच्या यादीत असल्याने आघाडीला बदनापूरमध्ये बंडाचा फटका बसू शकतो, असं सध्याचं वातावरण आहे..तर हे होते जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ.. आणि येणाऱ्या काळात बघायला मिळणारं इथलं संभाव्य राजकारण.. बाकी मराठा आरक्षणाचा मुद्दा येणाऱ्या विधानसभेलाही जालन्यात निर्णायक ठरु शकतो.. आता याचा फायदा आणि तोटा नेमका कुणाला सहन करावा लागेल, हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहेच.. बाकी जालन्यात यंदा कोण महायुती की महाविकास आघाडी… तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा