नववीत शिकणाऱ्या मुलाने रेखाटले जयंत पाटलांचे हुबेहुब चित्र ; जयंत पाटलांनी घेतली सोशल मीडियातून दखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणीतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या बाल चित्रकाराने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कृष्णधवल चित्र रेखाटले आणि या चित्राची दखल घेत पाटलांनी त्यांच्या सोशल मीडियावर ते शेअर करत या बालकलाकाराचे कौतुक केल्याने परभणीतील ग्रामीण भागात शिकणाऱ्या या बालकाची आता जिल्हाभर चर्चा होत आहे.

    रविवारी सायंकाळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी त्यांच्या अधिकृत फेसबूक, ट्विटर या सोशल मीडियावर त्यांचे कृष्णधवल रंगामध्ये स्केच केलेले एक चित्र प्रसिद्ध केले. या चित्राला कॅप्शन देत, परभणीतील पाथरी तालुक्यात असणाऱ्या रेनापुर गावच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या अभिषेक अनिल गायकवाड या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचे हे स्केच काढल्याबद्दल कौतुक करत आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्या फेसबुक पेजवर हे चित्र येताच जिल्हाभर या बालकाची चर्चा पाहायला मिळाली.

   यासंदर्भात हॅलो महाराष्ट्राच्या प्रतिनिधीने सदरील बालकाची माहिती घेतली असता, अभिषेक अनिल गायकवाड पाथरी शहरातील शांताबाई नखाते शाळेमध्ये इयत्ता नववीत शिकत असल्याची माहिती मिळाली. अभिषेकचे वडील अनिल गायकवाड व्यवसाय म्हणून तालुक्यात पेंटरचे काम करतात.

अभिषेकने आतापर्यंत चित्रकलेचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले नाही किंवा त्याने चित्रकलेची कोणतीही परीक्षा ही दिलेली नाही. फक्त चित्रकलेच्या आवडीतून तो इयत्ता चौथी पासून विविध प्रकारचे चित्र रेखाटत असतो. यातून त्याला याचा छंद लागला आहे. त्यामुळे त्याने विविध राजकीय नेत्याचे त्यामध्ये , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते विधानसभेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची चित्रे  रेखाटली आहेत. अभिषेक कुठल्याही प्रशिक्षणाविना अगदी हुबेहूब चित्र रेखाटतो व त्या चित्रात जिवंतपणाही असतो. यातून भविष्यात मोठा चित्रकार व्हायचे त्याचे स्वप्न आहे. काही दिवसापूर्वी त्याने राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटलांचे असेच एक स्केच रेखाटले आणि ते त्यांना पाठवले हे चित्र जयंत पाटलांना एवढे आवडले की त्यांनी ते रविवारी त्यांच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंट वर प्रसिद्ध करत अभिषेकचे कौतुक व आभार व्यक्त केले आहेत.

  पाटील म्हणाले आहेत की, “परभणीतील पाथरी तालुक्याच्या रेणापूर येथे नववीत शिकणाऱ्या अभिषेक अनिल गायकवाड या माझ्या छोट्या मित्राने हे चित्र रेखाटले आहे. मला नुकतेच हे स्केच मिळाले.

अभिषेक, तुमचे मनापासून आभार !
तुमचे कलेतील नैपुण्य बहरत राहो, या शुभेच्छा!

यानंतर सोशल मीडियावर अभिषेकचे नेटकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर कौतुक केले. जयंत पाटलांनी त्यांच्या सोशल अकाउंटवर चित्र प्रसिद्ध केले असल्याचे अभिषेकचे वडिल अनिल गायकवाड यांना समजल्यानंतर ते भावुक झाले. यावेळी ते म्हणाले की,

साहेब, मी अभिषेकचा वडील आहे.
मी एक सामान्य पेंटरचे काम करणारा व्यक्ती आहे. आपण त्याच्या कलेला दाद देऊन आशीर्वाद दिले,

त्याबद्दल आपले अतिशय मनापासुन धन्यवाद.

त्यांच्या या काॅमेंटवर खुद्द जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत “अनिलजी, अभिषेकची चित्रकला बहरत राहो, या शुभेच्छा” असं म्हणत या मुलाचं कौतुक करत त्याच्या वडिलांनाही सदिच्छा दिल्या.

दरम्यान ही कौतुकाची थाप दिल्यानंतर रेनापुरग्रामस्थही ही आनंदले असून गावातील मुलाचे राज्याच्या  मंत्र्यांनी कुतूहल केल्याने तेभारावले आहेत.

https://www.facebook.com/1029783367152303/posts/1829056230558342/?substory_index=0