हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असुन त्यांनी आज पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट सुद्धा घेतल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यानावर वाऱ्यासारख्या पसरल्या. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अखेर जयंत पाटील यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येऊन याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. माझी आणि अमित शाह यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झालेली नाही, ज्या काही बातम्या पेरण्याचे काम काही वृत्तवाहिन्यांकडून सुरु आहे त्याचा शोध तुम्हीच घ्या असं जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.
जयंत पाटील म्हणाले, माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु अशा बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. मी पुण्याला गेलो कधी? रात्री मी शरद पवार साहेबांसोबत होतो. आजही मी माझे सहकारी अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा यांच्यासोबत रात्री होतो . सकाळी शरद पवारांसोबत होतो. त्यामुळे मी कुठे गेलो? काय केलं याबाबत पुरावे असतील तरच बातम्या द्या. बातमी देणाऱ्याने काहीतरी अभ्यास केला पाहिजे असं म्हणत जयंत पाटील यांनी मीडियाला खडसावलं.
अशाप्रकारच्या बातम्या कोणी पेरल्या याबाबतचे माझ्याकडे पुरावे नाहीत. त्यामुळे भाजप किंवा अजित पवार गटावर बोलण्यात काही अर्थ नाही. माझा पक्ष मोठा व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मी आहे इथेच आहे. असं म्हणत जयंत पाटलांनी अमित शहांच्या भेटीबाबत सुरु असलेल्या सर्व चर्चातील हवाच काढून टाकली. माझ्याबद्दल मोबाईलवर ज्या काही बातम्या येत आहेत, ती एक प्रकारची करमणूक आहे. परंतु ही करमणूक माझ्याबाबत गैरसमज पसरवणारी आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी व्हायरल बातम्यांबाबत नाराजी व्यक्त केली.