हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने चांगलीच बाजी मारली. महाविकास आघाडीत शरद पवार गटाने एकूण १० जागा लढवल्या होत्या, यातील ८ ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. पक्ष फुटला, चिन्ह गेलं, नेते सोडून गेले तरीही शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवली आणि विरोधकांना धोबीपछाड दिला. शरदचंद्र पवार गटाच्या या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील… त्याच निमित्त सांगलीत जयंत पाटील यांच्यासाठी खास बॅनरबाजी करण्यात आली आहे. लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील (Jayant Patil Banner) असा उल्लेख या बॅनर वर पाहायला मिळत आहे.
लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर निवडणूक लढवत 8 खासदार निवडून आणले. त्यामुळे पक्षाचा स्ट्राईक रेट हा 80 टक्के आहे असा उल्लेख सदर बॅनर वर करण्यात आला आहे. तसेच,नवनिर्वाचित खासदारांच्या हार्दिक अभिनंदन… लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील असं म्हणण्यात आलंय. या बॅनरवर जयंत पाटील यांचा भलामोठा फोटो … त्याच्यावर शरद पवारांचा फोटो आणि खाली सर्व नवनिर्वाचित खासदारांचे फोटो झळकत आहेत. सांगली शहरात ठिकठिकाणी असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. नाद घुमला आभाळी वाजली तुतारी,जनसामान्यांच्या मनात गाजली तुतारी… असं म्हणत विरोधकांना टोलाही लगावण्यात आलाय.
शरद पवारांचे एकनिष्ठ जयंत पाटील –
जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय मोठं आणि वजनदार नाव .. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव .. अतिशय हुशार, उच्चशिक्षित, विद्वान अशी त्यांची ओळख … राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते स्थापनेपासून जयंत पाटील शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जाते. मागच्या वर्षी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत शरद पवारांना धक्का दिला. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी शरद पवारांची साथ सोडली. मात्र जयंत पाटील खंबीरपणे शरद पवारांसोबत उभे राहिले. फक्तच उभेच राहिले नाहीत तर पुन्हा एकदा पक्षाची बांधणी केली. प्रदेशाध्यक्ष पदाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पुन्हा एकदा फळी त्यांनी उभी केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पक्षासाठी कोणत्या जागा मागायच्या इथपासून ते कशा जिकवून आणायच्या हि सगळी आखणी जयंत पाटलांनी अतिशय योग्यपणे केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० पैकी ८ जागा निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.