कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे संस्कार आणि प्रेरणा यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. माँ साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच या देशाला शिवछत्रपतींसारखा युगपुरूष लाभला. त्यामुळे या दोघांचेही महात्म्य अधोरेखित करणारे तैलचित्र शिवाजी विद्यापीठाला प्रदान करताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, असे उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज येथे काढले.
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शिवभक्त लोकआंदोलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात (दीक्षान्त सभागृह) लावण्यासाठी म्हणून राजमाता जिजाऊ आणि शिवराय यांची चित्रकृती आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ‘शिवरायांची कीर्ती सांगे, आईच माझा गुरू’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असणारी ही चित्रकृती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार जे.बी. सुतार यांच्याकडून मुळीक व इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी विशेषत्वाने करवून घेतली आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी रेखाटलेल्या या तैलचित्राचा आकार ८X१० फूट इतका भव्य आहे. मुळीक म्हणाले, हजारो शब्द जो परिणाम साधणार नाहीत, ते काम एखादे सुंदर चित्र करू शकते. म्हणून या चित्राच्या हजारो प्रती घरोघरी पोहोचविण्यात आल्या आहेत. ही अद्वितिय चित्रकृती तिच्या लौकिकाला साजेशा योग्य ठिकाणी लावली जावी, या भावनेतून शिवाजी विद्यापीठाकडे ती सुपूर्द करण्यात आली आहे.
यावेळी इंद्रजीत सावंत म्हणाले, छत्रपती शिवराय हे जसे आपल्या सर्वांचे दैवत आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाविषयीही सर्व शिवप्रेमींमध्ये आपुलकीची, प्रेमाची व आदराची भावना आहे. त्याचप्रमाणे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी छत्रपतींचा मूळ इतिहास सांगणारी विविध कागदपत्रे जगासमोर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ही चित्रकृती शिवाजी विद्यापीठात असण्याला एक वेगळे औचित्य व महत्त्व आहे. त्यातून जिजाऊंचे शिवरायांना घडविण्यातील योगदान तर विद्यार्थ्यांसमोर येत राहीलच; शिवाय, महाराजांप्रमाणे कर्तबगारी गाजविण्याची प्रेरणाही देत राहील, अशी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी हे तैलचित्र विद्यापीठाकडे सुपूर्द केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यापीठासाठी तसेच व्यक्तीगतरित्या माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा असा चिरस्मरणीय क्षण आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवरायांना त्यांच्या वाटचालीमध्ये सातत्याने योग्य दिग्दर्शन केले. शिवरायांच्या जडणघडणीत त्यांचा किती मोलाचा वाटा आहे, हे प्रत्ययकारकपणे दर्शविणारे हे जे.बी. सुतार यांचे एक अप्रतिम तैलचित्र आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक आणि बारकाव्यांनिशी अत्यंत जिवंत वाटाव्यात, अशा व्यक्तीरेखा रेखाटल्या आहेत. या तैलचित्राला राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात लावून योग्य तो सन्मान केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्यासह इतिहास संशोधक गणेश नेर्लेकर-देसाई, शशिकांत पाटील, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, इंद्रजीत माने, अवधूत पाटील, शरद साळुंखे, कृष्णाजी हरुगडे, गुरुदास जाधव आदी उपस्थित होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा