हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या खूप तणाव आहे. ५ जानेवारीला झालेल्या हिंसेनंतर देशभरातून येथील विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळतो आहे. काही उजव्या संघटनांकडून विरोध झाल्याचं चित्रही यावेळी पाहायला मिळालं. जेएनयूचे विद्यार्थी अनेक वर्ष शिकत राहतात, आंदोलने करतात या प्रतिमेला छेद देणारी घटना नुकतीच समोर आली आहे. २०१९ मध्ये राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES) या परीक्षेत जेएनयुमधील १८ विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी हे जेएनयू मधले आहेत. यामुळे जेएनयुच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे. विद्यापीठ फक्त वादग्रस्त मुद्यांसाठी नसून चांगलं शिक्षण घेणारी मुलंही इथून बाहेर पडतात हे या निकालाने सिद्ध केलं आहे, ओडिसाचा अंशुमन कमालिया या परीक्षेत देशात पहिला आला आहे. अंशूमन जेएनयूमधील अर्थशास्राचा विद्यार्थी आहे.