कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
संपूर्ण जगभरात आपल्या वैद्यकीय सेवेचे जाळे पसरविलेल्या नामांकीत अशा ॲस्टर आधार हॉस्पिटल आणि मुंबईतील सुप्रसिद्ध हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलच्यावतीने स्टाफ नर्स पदासाठी कराड येथे कृष्णा अभिमत विद्यापीठात 29 व 30 ऑक्टोबर रोजी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या उमेदवारांना या नामांकीत हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठातील नर्सिंग अधिविभागात बी.एस्स्सी. नर्सिंग, एम.एस्स्सी. नर्सिंगसह अन्य पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनींना जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात मान्यता असून, अनेक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या एका कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ‘कृष्णा’च्या नर्सिंग अधिविभागातील सुमारे 233 विद्यार्थी – विद्यार्थीनींची निवड मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. यापैकी 66 जण प्रत्यक्ष सेवेत सहभागी झाले आहेत.
आता भारतासह मध्य पूर्वेतील संयुक्त अरब अमिरात, कतार, सौदी अरेबिया आदी देशांत वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या ॲस्टर आधार हॉस्पिटल, तसेच मुंबईतील ‘फोर्टिस नेटवर्क’च्या सुप्रसिद्ध हिरानंदानी हॉस्पिटलच्यावतीने स्टाफ नर्स पदासाठी दि. 29 व 30 ऑक्टोबर रोजी कृष्णा अभिमत विद्यापीठात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतींसाठी दि. 29 रोजी ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या नर्सिंग सेवा विभागाच्या व्यवस्थापक अनिंदिता नंदी, सहाय्यक व्यवस्थापक नागेश गुंडप, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक सुनील फोंडके, तसेच दि. 30 रोजी हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या पूजा सेन, नर्सिंग विभागाच्या बिंदू रेजी, सोनम जुईकर, मिथुन येडगे, राकेश मोहिते उपस्थित राहणार आहेत. या कॅम्पस मुलाखतींसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सकाळी 10 वाजता फोटो आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या नर्सिंग अधिविभागात उपस्थित राहावे, असे आवाहन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी केले आहे.