सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार ग्रामपंचायतीला जाण्यासाठी 150 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी अद्याप रस्ता नाही. तर गावाला जोडणाऱ्या नदीवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत.
रुग्ण, शालेय विद्यार्थी, गरोदर महिला यांना रस्ता नसल्याने पायपीट करावी लागते. वेळप्रसंगी रुग्णांना झोळीच्या साहाय्याने रुग्णालयात न्यावे लागते. पावसाळ्यात नदी दुथडी वाहत असल्याने येथील नागरिकांचा संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांचे हाल होतात. पंचायत समितीला वारंवार सांगून देखील या गावाला जाण्यासाठी रस्ता न केल्याने याचा निषेध करण्यात आला.
आज RPI पक्षाच्या वतीने महाबळेश्वर पंचायत समिती कार्यालयाबाहेर प्रशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. धनगर वस्ती आणि बौद्ध वस्ती येथे पावसाळ्यापूर्वी नदीवरील पूल बांधण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.