कराड | पाटण मतदारसंघातील वसंतगड (ता. कराड) या गावातील ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई गटातील पक्ष प्रवेशानंतर काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाटणकर गटात स्वगृही परतले आहेत. त्यामुळे पाटण व कराड तालुक्यात वसंतगड गावचे राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. गावातील स्थानिक राजकीय कुरघोडीतून हा प्रकार घडला होता. यामध्ये आर. वाय. नलवडे दादाच सदस्यांच्या पुनः पक्ष प्रवेशामुळे गावातील एक्का असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
वसंतगड येथील ग्रामपंचायत निवडणूक 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या गटाने बिनविरोध केली होती. गावचे नेते व कै. विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. या गावात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला निवडणुकीत उभे करण्यासाठी उमेदवारही मिळाले नव्हते. परंतु काही दिवसापासून स्थानिक पातळीवर राजकारणात कलह निर्माण झाला होता.
शुक्रवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी वसंतगड गावच्या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. सकाळी 11 वाजता आलेल्या सदस्यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रवेश दिला. परंतु त्यानंतर रविवारी गावचे ज्येष्ठ नेते आर. वाय. नलवडे (दादा) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सर्व 9 सदस्यांनी आम्ही आर. वाय. नलवडे यांच्यासोबत असून राष्ट्रवादीत असल्याचे सांगितले. आज रविवारी (दि.7) रोजी नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची भेट घेतली. तसेच आम्ही राष्ट्रवादीतच असून कोणत्याही गटात प्रवेश केला नसल्याचे जाहीर केले.
आम्ही पाटणकर घराण्यांशी एकनिष्ठ : सरपंच
स्थानिक आमदार असल्याने विकास कामे मागणीसाठी आमचे वसंतगड ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यांनी निवेदन देताना फोटो काढले. नंतर खोटारडेपणा करुन या ग्रामस्थांनी शिंदे गटात प्रवेश केला असं जाहीर केलं. आम्हीं सदैव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पाटणकर घराण्याशीच एकनिष्ठ आहोत, असे सरपंच अमित नलवडे यांनी सांगितले.