सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
शहरातील बेपत्ता असणाऱ्या युवक आणि युवतीचे मृतदेह कण्हेर (ता. सातारा) येथील धरणात आढळले. त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. ज्योत्सना कुमार लोखंडे (वय- 25, रा. लोखंडे कॉलनी, प्रतापगंज पेठ, सातारा) आणि आरबाज इब्राहिम देवाणी- कच्छी (वय- 25, रा. बुधवार नाका परिसर, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
लोखंडे कॉलनीत ज्योत्सना कुटुंबीयांसमवेत राहण्यास होती. परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी नेट कॅफेत जाते असे सांगून दुचाकी घेऊन ती गुरुवारी घराबाहेर पडली. रात्र झाली तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. शुक्रवारी सकाळी कण्हेर धरणालगत एक दुचाकी उभी असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. याची माहिती काही जणांनी स्थानिकांना दिल्यानंतर त्यांनी शोध घेतला असता पाण्यात युवतीचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी दुचाकीबाबतचा शोध घेतल्यानंतर मृतदेह बेपत्ता ज्योत्स्ना हिचा असल्याचे समोर आले.
याचदरम्यान बुधवार नाका परिसरात राहणारा आरबाज इब्राहिम देवाणी-कच्छी हादेखील बेपत्ता असल्याचे समोर आले. प्रतागपंज पेठेतून काही युवक त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी परिसरात शोध घेतला असता बेपत्ता आरबाजचा मोबाइल हॅंडसेट तसेच गॉगल एका अडगळीच्या जागी सापडला. यावरुन त्यानेदेखील ज्योत्स्नासह पाण्यात उडी मारुन आत्महत्या केल्याच्या शक्यतेने स्थानिकांच्या मदतीने पुन्हा शोध घेण्यास सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास पाण्यात बुडालेला आरबाजचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ज्योत्स्ना तसेच आरबाज यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.