बलात्काराच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून पत्रकारालाच तुडवलं (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जळगाव येथील पाचोरा तालुक्यात पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यावर जबर मारणार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घडलेल्या सर्व प्रकाराचा व्हिडिओ खासदार रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यामुळे पत्रकार संदीप महाजन यांना ही मारहाण करण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलीये का नाही हा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या महिन्यातच जळगाव जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादाय घटना घडली आहे. याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यवस्थेवर टीका केली होती. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यामुळे महाजन यांना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांना मारहाणीची धमकी देण्यात आली. मुख्य म्हणजे, यासंबंधित ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर आपणच पत्रकार महाजन यांना शिवीगाळ केल्याचे किशोर पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. यादरम्यानच पाचोरा तालुक्यात पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. आता पत्रकार महाजन यांना ही मारहाण किशोर पाटील यांच्या माणसांकडून झाली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.

दरम्यान, पत्रकार महाजन यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी, “पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची का ? तर त्याने विरोधात बातमी छापली. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल” अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.