जीवनाला वळण देणारी विंदांची कविता, जाणून घ्या विंदांच्या कवितेचा अद्भुत प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आज विंदा करंदीकर यांचा स्मृतिदिन. कविता जगणाऱ्या आणि जगायला शिकवणाऱ्या या अद्भुत माणसाच्या कवितांची सफर घडवून आणलीय समीर गायकवाड या अवलिया लेखकाने. आवर्जून वाचावा असा हा प्रवास तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.

आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. अशा वेळी जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला उभारी मिळणे खूप आवश्यक होउन जाते अन्यथा दैनंदिन जीवनातील रुक्ष जीवनशैलीतली व्यावहारिक शुष्कता मनात खोल रुजते अन माणूसपणच हरवून जाते. अशा अवस्थेत जीवनाला वळण देणारी एखादी भव्य कविता समोर आली तर जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलून जातात. विंदा करंदीकरांची अशीच एक कविता आहे जी जगणे सुसह्य करते अन जीवनातले नवे अर्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. कवितेचे नावच आहे ‘घेता’. यावरून यातील आशयाची कल्पना यावी. अगदी उदात्त आशयाची ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात संदेह नाही…

देणारयाने देत जावे –
‘देणार्‍याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्याश्या भिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी
देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे.’

या कवितेत त्यांनी कोणाकडून काय घ्यावे याचे जे वर्णन केले आहे ते त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. अत्यंत लालित्यपूर्ण अशा या वर्णनात वीररस आणि भक्तीरस यांचा मनोहारी संगम आहे, शिवाय त्यात गेयतादेखील आहे. ‘हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी’ हे वर्णन प्रत्येक मरगळलेल्या मनगटात रग भरणारे आहे, यात एक अलौकिक जोश आहे. जीवनातल्या त्याच त्या गोष्टींना कंटाळून एक साचेबद्ध आकार आयुष्याला जेंव्हा प्राप्त होतो तेंव्हा ‘वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे’ अशी अभूतपूर्व शिकवण इथे आहे. ‘रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे’ असे सांगताना कवी अगदी हळुवारपणे माती आणि रक्ताचे नाते अधोरेखित करतात. मनापासून ते नात्यापर्यंतची कुठलीही समस्या समोर आली तर तिचे मूळ आपल्या मनात – पर्यायाने विचारांच्या अंकुरात याचे उत्तर सापडते. पण हे उत्तर नजरेस पडण्यासाठी मातीशी नाळ घट्ट पाहिजे. म्हणून रक्तातल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे असे कवी म्हणतात. जीवनातला जोश आणि होश दोन्ही कमी होत चालल्यावर ‘उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी’ असं बेभान पण संयत सांगणं इथे आहे. ‘भरलेल्याश्या भिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी’ या पंक्तीतून कवितेचा बाज बदलतो आणि आशय अधिक गडद होतो. भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले की मग येते ती निवृत्ती अन त्यातून देण्याची भावना आपल्या ठायी निर्माण होते. ही भावनाच द्यायला शिकवते अन शेवटी विंदा कवितेला कलाटणी देतात अन लिहितात की, ‘घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे !”

ही कविता मरगळलेल्या मनाला उभारी देते, पिचलेल्या मनगटात जोश भरते आणि अनेकविध प्रश्न माथी मिरवत जगण्याचे अर्थ हुडकत फिरणारया संभ्रमित मनाला उत्तुंग असे प्रेरणादायी उत्तर देते. या पलीकडे जाऊन जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर विंदांच्या ‘जडाच्या जांभया’ या कवितेत जीवनाचे सार व्यक्त होते.

‘रडण्याचेंही बळ नाही;
हसण्याचेही बळ नाही;
मज्जा मेली; इथें आतां जीवबाची कळ नाही.
संस्कृतीला साज नाही. मानवाला माज नाही;
आज कोणा, आज कोणा, जीवनाची खाज नाही.…
जन्मलेल्या बाप नाही; संचिताचा ताप नाही;
यापुढे या मानवाला अमृताचा शाप नाही.
जाणीवेची याच साधी राहिली मागें उपाधीं;
या जडाच्या जांभया हो ना तरी आहे समाधी!’

मृदगंध मधील ‘हीच दैना’ या कवितेत अन्यायाच्या जाणीवा त्याविरुद्धचा संघर्ष या मूक दुःखाचे अप्रतिम वर्णन आहे –
‘सडलेल्या पंखांनांही उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा हाच माझा रे हव्यास.
आकाशाची निळी भाषा ऍकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता झिजे चोंच झिजे चोंच!
जाणिवेच्या पिंजर्‍यात किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख, हीच दैना हीच दैना.. ‘

प्रेमात आकंठ बुडाल्यावर जगण्याची एक उर्मी मिळते, एक प्रेरणा मिळते पण त्याच प्रेमात घात झाला तर जगणेच परके होऊन जाते अन आपल्याच घरी आपण पाहुणे होऊन जातो हे अगदी सुंदररीत्या विंदांनी या कवितेत मांडले आहे.

‘सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला,
सांगू कसे रे याहुनी घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी माझ्या सभोती घालते,
माझ्या जगाची भिंत मी ठरते परी ती काच रे,
दिसतोस मजला त्यातुनी संसार मी करिते मुका,
दाबून माझा हुंदका दररोज मी जाते सती,
आज्ञा तुझी ती मानुनी वहिवाटलेली वाट ती,
मी काटते दररोज रे अन्‌ प्राक्तनावर रेलते,
छाती तुझी ती मानुनी अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी’

या कवितेत त्यांनी प्रेमातला विरह हा नैसर्गिक असल्याचे मानत त्यासाठी जगाला का दोष दयायचा अशी पृच्छा केली आहे..
‘भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी
फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी
येता भरून आले जाता सरून गेले नाही
हिशेब केले येतील शाप कानी…..’

साठीची गजल मध्ये एक कविता आहे. त्यात विंदांनी प्रेमात चिंब न्हालेल्या माणसाची मनोवस्था मोजक्या शब्दात पण यथार्थपणे व्यक्त केली आहे –
सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी
हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी
आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !

प्रेमाच्या दुनियेतून बाहेर पडले की काटेरी जगाची टोकदार वास्तविकता जगणे अगदी बेचव, निर्जीव करून टाकते. त्यातून आयुष्याला तोचतो पणाचा बेगडी रंग चढतो याचे अगदी चपखल वर्णन ‘तेच ते नि तेच ते ‘ या कवितेत आहे. निरस विषयाची कविता असूनही तिला अर्थ आहे अन गेयता देखील आहे-
“सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते ll
खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार…..”

सर्व भावनांचा आवेग ओसरल्यावर माणूस स्वतःचा अन जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत. विंदांनी देखील याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘असा मी तसा मी कसा मी कळेना’ याकवितेच्या शेवटी विंदा स्वतःचा शोध घेताना आत्ममग्न होऊन दिगंताच्या शोधात गुंतून जातात –
‘कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!
कधी संयमी, संशयात्मा,
विरागी कधी आततायी,
कधी मत्तकामी असा मी.. तसा मी..
कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!

स्वतःचा शोध घेताना आपल्या सारख्याच माणसाचाही शोध घ्यायचे ठरवले अन त्यासाठी अवतीभोवती पाहिले तर हाती निराशाच येते. कारण सगळीकडे तेच निरस जीवन जगणारी वरवर वेगळे वाटणारी पण कमालीची एकसुत्रता असणारी बेचव आयुष्यात रमलेली माणसे दिसून येतात. हे विदारक सत्य अत्यंत हलक्याफुलक्या शैलीत विंदांनी ‘सब घोडे बारा टक्के’ या कवितेत मांडले आहे –

‘जितकी डोकी, तितकी मते
जितकी शिते, तितकी भुते;
कोणी मवाळ्, कोणी जहाल
कोणी सफेत्,कोणी लाल;
कोणी लठ्ठ्, कोणी मठ्ठ्
कोणी ढिले,कोणी घट्ट् ;
कोणी कच्चे, कोणी पक्के
सब् घोडे बारा टक्के
गोड गोड् जुन्या थापा तुम्ही पेरा,
तुम्ही कापा; जुन्या आशा,
नवा चंग जुनी स्वप्ने,नवा भंग;
तुम्ही तरी करणार काय्?
आम्ही तरी करणार काय्?
त्याच् त्याच खड्ड्यामध्ये
पुन्हा पुन्हा तोच् पाय;
जुना माल्, नवे शिक्के
सब् घोडे बारा ट्क्के !
जिकडे सत्ता,तिकडे पोळी
जिकडे सत्य,तिकडे गोळी;
जिकडे टक्के,तिकडे टोळी
ज्याचा पैसा, त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा, हाच् कित्ता
पुन्हा पुन्हा, जुनाच स्वार मंद घोडा,
अंध स्वार याच्या लत्ता,
त्याचे बुक्के सब् घोडे बारा ट्क्के ! सब घोडे!
चंदी कमी कोण् देईल् त्याची हमी?
डोक्यावरती छ्प्पर तरी
कोण् देईल् माझा हरी?
कोणी तरि देईल् म्हणा
मीच फसविन् माझ्या मना;
भुकेपेक्षा भ्रम् बरा
कोण् खोटा, कोण् खरा;
कोणी तिर्या, कोणी छक्के
सब् घोडे बारा ट्क्के ! ‘

आपल्या काव्यप्रतिभेचे बोलके वर्णन त्यांनी केले आहे, शब्दांची रचना कशी स्फुरली अन त्यांची प्रस्तुती कशी झाली हे मार्मिक प्रतिमांतून त्यांनी लिहिले आहे.
‘स्वप्नामध्ये रचिल्या ओळी यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन शब्द बिचारे धडपडले;
प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना;
भ्याले स्वप्नांची चढण्या माडी!’

देवत्वावर भाष्य करताना आपल्या उत्क्रांती या कवितेत ते अगदी मानवनिर्मितीपर्यंतच्या खोलात जातात अन दोनच ओळीत देवाची व्याख्या करतात.
उत्क्रांती –
‘माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
पर दु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी’

पृथ्वीवर इतके सारे देश आहेत अन तिथे विविध जातीधर्माची, वर्णाची, भाषेची, प्रांताची, लिंगाची, बोलीची माणसे आहेत पण शेवटी ती सगळी एकच आहेत, हे त्यांनी अगदी खुबीने आपल्या कवितेत मांडले आहे. मानवाचे अंती एक गोत्र –
‘मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा;
-हाईनमध्ये ‘नंगा’ करो स्नान.
सिंधुसाठी झुरो आमेझान
थोर कांगो बंडखोर
टेम्स साठी नाईलच्या काठी
‘रॉकी’ करो संध्या;
संस्कृती अन वंध्या नष्ट होवो….’

‘माझ्या मना बन दगड’ या कवितेत जीवन जर सरधोपटपणे जगायचे असेल तर सदसदविवेकबुद्धीला बाजूला सारून पंचेंद्रिये गरजेनुसार बंद करून बथ्थड जिणे जगावे लागते हे मार्मिकरित्या स्पष्ट करताना त्यांनी मनुष्याच्यास्वार्थीपणावर आसूड ओढले आहेत

‘हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नको,
डोळे शिव! नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ माझ्या मना बन दगड!
हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश तुझ्या गळ्याला पडेल शोष कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर म्हणून म्हणतो ओत शिसे संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो माझ्या मना दगड हो!
हा रस्ता अटळ आहे ! अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा, होतील भुते या सोन्याचे बनतील सूळ सुळी जाईल सारे कूळ ऐका टापा! ऐका आवाज! लाल धूळ उडते आज त्याच्यामागून येईल स्वार या दगडावर लावील धार! इतके यश तुला
रगड माझ्या मना बन दगड..’

विंदांच्या अनेकविध विषयांवरील बहुआयामी अर्थाच्या आशयघन कविता हा मराठी कवितेतला अनमोल ठेवा आहे. या कवितांच्या जाणीवांतून जीवन व्यापक अर्थाने समृद्ध होत जाते अन सांस्कारिक जडणघडणीत मोलाचा वाटा या कविता उचलत राहतात. गोविंद विनायक करंदीकर उर्फ ‘विंदा करंदीकर’ हे मराठीतील प्रयोगशील – ख्यातनाम कवी, लघुनिबंधकार, भाषांतरकार आणि साक्षेपी समीक्षक. विंदा करंदीकर या नावाने करंदीकरांनी वैविध्यपूर्ण कविता लिहिली. आशयाचे, रचनेचे विविध प्रयोग केले. गझल, मुक्त सुनीते, तालचित्रांपासून ते बालकविता आणि विरूपिकेपर्यंत नाना प्रकारे आपल्या प्रतिभेची वाट रेखून पाहिली. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी जाहीर करण्यात आला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. विंदाना समीक्षकप्रेम आणि रसिकप्रेम भरभरून मिळाले कारण त्यांची शैली अन त्यांचे काव्यविषय !

विंदांच्या कवितेत असणारी विषयाची सर्वसमावेशकता आणि विविधता कशी आणि का आहे यावर खुद्द विंदांनीच प्रकाश टाकला आहे. विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरीता विंदाशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, “वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत.” हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात.

विंदाचे वडिल ‘विनायक करंदीकर’ कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. रा.स्व. ते मार्क्स असा त्यांचा वैचारीक प्रवास झाला. पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी पूर्ण लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्विकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.

विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हे सुद्धा सामाजिक कार्यात सक्रीय असतात. नंदू आणि उदय ही त्यांची मुले. विंदांनी मराठी काव्यमंजुषेत विविध घाटाच्या रंजक, वैचारीक, काव्यलेखनाने भर घातली. मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचेल असे पाहिले. विंदांचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांचेकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषेस परिचय झाला. विंदांनी पारंपारिक मुक्तछंदातही अनेक प्रयोग केले. मुक्तछंदाचे स्वातंत्र्य आणि सुनीत रचनेतील ओळींचे बंधन यांच्या मेळातून ‘ मुक्तसुनीत’ तयार केले. ‘आज प्रार्थना प्राणाऐवजी’ हे तेरा ओळींचे तर ‘हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगाऱ्यावर’ हे पंधरा ओळींचे सुनीत त्यांनी लिहिले. यात वृत्त व यमक संगती नसली तरी आवाका व परिणाम या दृष्टीने सुनितप्राय राहणे हे मुक्तीसुनितचे लक्षण ठरले.विंदांनी जशा मुक्छांदात कविता लिहिल्या तशा गाजला अभंग या प्रकारातही रचना केल्या… त्यांनी सामाजिक आशयाची कविता केली तर प्रेमकावितेला नाक न मुरडता तितक्याच आत्मीयतेने प्रेमकविताही केल्या, जितक्या निष्ठेने प्रौढांसाठी प्रलाग्भ कविता लिहिली तितक्याच निष्ठेने बालगीतसुद्धा लिहिली..

विंदागीते

‘’आपल्या प्रतिभेचे शील शाबूत ठेवण्यासाठी व तिच्या विकासाच्या शक्यता जिवंत राखण्यासाठी कवीने आपली मस्ती सांभाळली पाहिजे…’ असा एक महत्वाचा कानमंत्र करंदीकरांनी सांगितला आणि या ‘मस्ती’ची व्याख्याही त्यांनी केली आहे. – ‘काव्याच्या सृजनाव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचीही आणि कुणाचीही पर्वा न करणारी अनिवार्य उर्मी म्हणजे कवीची मस्ती’ हे कवीचे व्रत आहे. या व्रतातूनचं विंदा करंदीकरांची कविता ही जन्मली आणि आपल्या मस्तीत मुक्तपणे जगली…. १९३७ ते १९८५ हा काळ म्हणजे विंदांच्या लेखन प्रवासाचा कालखंड…. या कालखंडात त्यांनी आपल्या जीवनधर्म असलेल्या काव्यरचनेत विविध प्रयोग केले. बालकविता, तालचित्रे, अभंग, सूक्ष्मरचना, मुक्तसुनिते, विरूपिका असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले.

‘अमृतानुभवा’ सारख्या तत्वकाव्याचे अर्वाचीनीकरण हा सुद्धा विंदांचा एक प्रयोगचं होता. अशा अनेक अंगांनी काव्यनिर्मिती करून करंदीकरांनी मराठी कवितेत फार मोलाची भर टाकली. विंदांना कविता म्हणजे स्वदेशगंगा वाटायची.. त्यांची ‘स्वदेशगंगे’ पासूनची काव्यगंगा पुढे विविध वळणे घेत वाहू लागली .कालांतराने या गंगेला ‘बालकविता’ यमुनेच्या रुपात मिळाली. मोठ्या माणसांना ज्ञानात्मक आनंद देणारी आणि लहान मुलांना वेगळ्या राज्यात नेणारी बालकविता ही विंदांची मराठी काव्यासृष्टीला मिळालेली मोठी देणगी आहे. त्यांच्या ‘मावशी’ ,‘घड्याळ’, ‘पंतोजी’, ‘बेडकाचे गाणे’, ‘जादूगार’, ‘पतंग’ या बालगीतातील नाट्यप्रसंगातून तर त्यांनी बालकांचे निरागस मन प्रगट केले. ‘स्वेदगंगा’, ‘मृदगंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’, ‘अष्टदर्शने’ हे त्यांचे काव्यसंग्रह होत. ‘संहिता’ हा १९७५ मध्ये मंगेश पाडगावकर यांनी संपादित केलेला तर ‘आदिमाया’ हा १९९० मध्ये विजया राजाध्यक्ष यांनी संपादित केलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. ‘राणीची बाग’ या १९६१ मध्ये प्रकाशित झालेल्या बालकविता संग्रहानंतर १९९३ मध्ये प्रकाशित झालेला ‘बागुलबोवा’ हा बारावा बालकविता संग्रह होता.

‘स्वेदगंगा’ – हा करंदीकरांचा सर्वांत पहिला कवितासंग्रह. श्रमशक्तीचे, कष्टकर्‍यांच्या संघटित शक्तीचे निर्णायक महत्त्व सांगणारी व समूहनिष्ठा व्यक्त करणारी ही कविता आहे. १९४४ मधील या कविता मार्क्सवादाच्या प्रभावातून निर्माण झाल्या आहेत. या कवितांच्या आधारे करंदीकरांच्या कवितेतील सामाजिक जाणीव मार्क्सवादी आहे असा निष्कर्ष काढल्यास ते खरे ठरणार नाही. कारण याच संग्रहात काही इतर कविता राष्ट्रीय स्वातंत्र्याची आकांक्षा, राष्ट्रीय चळवळ व्यक्त करतात. या संग्रहात शब्दचित्रे, भावगीते, देवगड-राजापूरकडील कोकणी भाषेतील गाणी, बालगीते असे विविध काव्यप्रकार हाताळले आहेत…

‘मृद्गंध’- विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमालता, विमुक्त्पणा आणि संयम, अवखळपण आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्य ह्यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या एखाद्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते — अशा वेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य, तिची अवखळ झेप पाहता ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते — तर कधी कधी ‘लपत छपत हिरवळीतून’ वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगावाची मुसंडी आणि हरीणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतम बुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत मिस्किल नजर ह्यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात जशी ती रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वर वर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे, व्यक्तित्व वेगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकांस आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते. ‘मृद्गंध’ या संग्रहातील कवितांत ही सर्व वैशिष्ट्ये प्रकट झाली आहेत.

अष्टदर्शने – वयाच्या ८५ व्या वर्षी ‘अष्टदर्शनां’ची अभंगगाथा रचली. या गाथेला ते वार्धक्‍यातील ‘खेळ’ म्हणतात. ‘खेळ’ हीदेखील गंभीर, सखोल अर्थाची प्रतिमाच आहे. विंदांची एकूणच काव्यनिर्मिती हा एक गंभीर असा जीवनाविष्काराचा खेळ आहे. त्यात क्रीडादृष्टी आहे, कलादृष्टी आहे आणि जीवनदृष्टीही आहे.

“ती जनता अमर आहे’ ही ओजस्वी घोषणा विंदांमुळे मराठीत दुमदुमत राहिली. विंदांच्या कवितेत एका हाडामासाच्या मनुष्यप्रकृतीचा राकट, रगेल व वास्तव आत्मशोधही आहे. जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेतात. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी जाणीव विंदांच्या कवितेला व्यापून टाकते. ‘ये यंत्रा ये’ म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारे विंदा, क्रांतीची चाहूल घेत, ‘माझ्या मना बन दगड’ असेही म्हणतात…वर्गसंघर्षचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. त्यांची बालगीते असो, परम गीते असो वा स्त्रियांसाठी लिहिलेले स्थानगीते असो, यातील प्रत्येक गीतांमध्ये ‘जीवनातल्या वास्तवाची पेरनी सहजगत्या करणे’ हे त्यांचे खास वैशिष्ट्य दिसून येते. ‘आकाशाचा अर्थ’ आणि ‘स्पर्शाची पालवी’ या त्यांच्या ललित लेखांतील बहुतेक निबंधांतून त्यांची चिंतनशील वृत्तीही दिसून येते. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे विंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य…

ज्ञानपीठ पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना १९८५ मध्ये मिळालेला महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, १९७० चा सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७), कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान, साहित्य अकादमी महत्तम सदस्यता , महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार, भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार, डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार आदी महत्वाचे पुरस्कार विंदांना मिळाले होते.

करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय तत्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगुळ टाळून सामाजिक, राजकीय कविता लिहिणे कठीण होते पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे. पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही. करंदीकरांची प्रकृती ही तेचतेच दळण यशस्वीपणे दळत राहणार्‍या माणसाची नाही. तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो. नव्या अनुभवांना भिडत असतो. काहीवेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छांदिष्टपणा प्रकट करीत असतो. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समिक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगानी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. तेव्हा त्यांना मिळालेले ‘ज्ञानपीठ’ हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे.” ‘संहिता’ या काव्य संग्रहाच्या संपादनात ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी या शब्दात विंदांच्या साहित्यसेवेचे ऋण व्यक्त केले आहे.

साहित्यसमीक्षा लेखन हाही करंदीकरांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा एक स्वाभाविक आविष्कार म्हणावा लागेल. समकालीन साहित्य व साहित्यमूल्ये यांचा वेध घेताना त्यांच्या स्वतःच्या साहित्यधर्माची खास वैशिष्ट्येही प्रकट होतात. रूढ साहित्यमूल्यांना प्रश्‍न विचारण्याची शोधक समीक्षादृष्टी करंदीकरांच्या साहित्यविचारात आहे. “उद्‌गार’ (भाषणसंग्रह), “साहित्यमूल्यांची समीक्षा’ (मूळ इंग्रजी लेखांचा अनुवाद) यांसारखी त्यांची पुस्तके खूप उशिरा आली. “परंपरा व नवता’ हा महत्त्वाचा पण एकांडा राहिलेला समीक्षासंग्रह समकालीन समीक्षेचा एक मानदंड मानला जातो. “स्पर्शाची पालवी,’ “आकाशाचा अर्थ’ हे त्यांचे ललित लेख आजही वाचनीयता टिकवून आहेत. त्यांनी मुलांची कल्पनाशक्ती विचारात घेऊन खूप मस्त बालकविता लिहिली. विंदांचे फार मोठे योगदान म्हणजे सांस्कृतिक कर्तव्यबुद्धीने व मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या हेतूने केलेले अनुवाद हे होय. “राजा लियर’चा अनुवाद मराठीत आदर्श ठरला. “ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ हे इंग्रजीतील अनेक भाषांतरे अभ्यासून मराठीत त्यांनी उत्तम असे भाषांतर सिद्ध केले.

मोठा प्रतिभावंत केवळ इतिहासाचे अपत्य नसतो, तो इतिहासाचा एक जनकही असतो हेच खरे! या संदर्भात ज्येष्ठ समीक्षक रा.ग.जाधव यांनी विंदा करंदीकरांची काही अवतरणे दिली आहेत, तीच मी इथे देत आहे. त्यांचा अर्थ व अर्थपूर्णता आधी म्हटलेल्यासंदर्भात किती महत्त्वाची आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जीवनवेधी कला – “जीवनवेधी कलेत सर्जनशील साहित्य, प्रायोगिक कला असलेले नाट्यवाङ्‌मय आणि चित्रपट यांचा समावेश होईल. इथे कल्पनाजन्य जीवनदर्शन सर्वांत महत्त्वाचे. घाट दुय्यम आणि उपयोग सांस्कृतिक असतो.” साहित्य आणि सामान्य माणूस – “साक्षर सामान्य माणसाला फक्त सामान्य माणसाबद्दलचेच साहित्य वाचायला आवडते, असे वाटणे चुकीचे आहे. कुणालाही खूप काळ स्वतःला आरशात पाहायचे नसते. स्वतःच्या जाणिवांचा विस्तार करण्याची, तसेच स्वतःची कल्पनाशक्ती मुक्त करण्याची इच्छा मानवी मनात असणे इतके स्वाभाविक आहे, की तशी संधी मिळते तेव्हा तो क्षुधितप्रमाणे अपरिचितावर व न नांगरलेल्या भूमीवर झडप घालतो.”

सुसंस्कृतता आणि सृजनशीलता – “वाङ्‌मयीन कलावंताच्या बाबतीत तर सृजनशीलता आणि सामाजिक सुसंस्कृतता यातील नाते मूलभूत ठरते… पहिली अशिक्षित बहुजन समाजाची सुसंस्कृतता जातीयता, निरक्षरता, दैववाद आणि अंधश्रद्धा यांनी ग्रस्त आहे; तर दुसरी सुशिक्षित वर्गाची सुसंस्कृतता पराकोटीचा व्यक्तिवाद, भ्रष्टाचार, व्यापारी वृत्ती आणि मूल्यांची घसरण यांनी पोखरलेली आहे. अनेक क्षेत्रांतील सृजनशीलतेपुढे ही एक सांस्कृतिक दरी आव्हान म्हणून ठाकली आहे. याबाबत वाङ्‌मयीन कलावंतांवर काही जबाबदारी आहे की नाही?” (अवतरणांचे सर्व संदर्भ – “साहित्यमूल्यांची समीक्षा’ – पृष्ठे २८, ११२, ११६ – ११७) विंदा म्हणतात त्या प्रमाणे प्रत्येक माणसाने एक दिवस घेता घेता देणारयाचे हात जर घेतले तर जगणे सुंदर आहे या वाक्याचा खरा अर्थ उमजून येईल. जीवनाच्या सर्व वयातले सकल सार आपल्या कवितांतून मांडणारे विंदा करंदीकर हे खऱ्या अर्थाने जीवनकवी होत…

– समीर गायकवाड. (8380973977)