KCR उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, ‘या’ बड्या नेत्याची भेट घेणार; चर्चाना उधाण

KCR
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रावर आपलं विशेष लक्ष्य ठेवलं आहे. शहरी भागांप्रमाणे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सुद्धा केसीआर यांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र्रातील काही नेत्याना आपल्या गळाला लावण्याचे कामही केसीआर यांच्याकडून सुरु आहे. गेल्या महिन्यात आषाडी एकादशी निमित्त केसीआर प्रथमच पंढरपूरला आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा के.चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून ते राज्यातील एका बड्या नेत्याला भेटणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

उद्या 1 ऑगस्ट रोजी बीआरएस पक्षाचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. के चंद्रशेखर राव सर्वात प्रथम उद्या सकाळी ठीक दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचतील. पुढे ते वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या जयंतीला हजेरी लावतील. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील देखील असणार आहेत. यानंतर ४ वाजता केसीआर अंबाबाईचे दर्शन घेतील आणि नंतर हैदराबादसाठी रवाना होतील.

रघुनाथ पाटील BRS सोबत जातील?

सध्या बीआरएस पक्ष संघटन बांधणीसाठी वेगाने प्रयत्न करताना दिसत आहे. यासाठीच मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव देखील महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. चंद्रशेखर राव यांनी अनेक पक्षांच्या नेत्यांना वेगवेगळ्या ऑफर्स दिले आहेत. अशातच आता उद्या चंद्रशेखर राव कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबत रघुनाथ पाटील देखील असणार आहेत. उद्या चंद्रशेखर राव पाटील यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमासाठी हजर राहतील. त्यानंतर ते रघुनाथ पाटील यांच्या घरी देखील जाणार आहेत. सध्या यामुळेच पाटील आगामी काळात चंद्रशेखर राव यांच्यासोबत काम करतील अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हैदराबादमध्ये राव यांची भेट घेऊन बीआरएससोबत काम करणारा असल्याचे आश्वासन दिल्याचे माहिती समोर आली होती. मुख्य म्हणजे, राव यांच्यावर शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव असल्यामुळे याचा फायदा त्यांना शेतकरी संघटनेसोबत पक्ष बांधणी करताना होणार असल्याचा म्हटले जात आहे.