जालना | आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची बातमी ताजी असतानाच आता महाविकास आघाडीला अजून एक झटका बसला आहे. काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नाही तर ते पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे ते राजीनामा सोपवतील.
“हम वफा कर के भी उनके नजरों से गिर गये,” अशा शब्दात कैलास गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा पराभव केला होता. परंतु मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत.
मला मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन दिले होते पण मला का डावलेले हे मला समजत नाही. मी तीन वेळा निवडून आलो आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा विक्रमी मतांनी पराभव केला तरीही मला डावलले गेले अशी खंत गोरंट्याल यांनी व्यक्त केली.