औरंगाबाद | श्री क्षेत्र वेरुळ येथील कैलास आश्रमाचे मठाधिपती ‘श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज’ यांचे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. पंधरा दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यावरुन परतले होते. त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
भागवतानंदगिरीजी महाराज यांचा मोठा शिष्य परीवार आहे. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास समाधीचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर घटनेमुळे वेरुळ सह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली. महाराजांचा वेरुळ परिसरासह राज्यात तसेच परराज्यात मोठा भक्त परिवार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना या समाधीच्या कार्यक्रमास येणे शक्य झाले नाही. अनेक भाविकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाधीचा कार्यक्रम पाहिला. भागवतानंदगिरीजी महाराज यांचे गुरू मध्यप्रदेशमधील इंदूर इथले आहेत. त्यामुळे आता मठाधिपतीपदी कोण विराजमान होणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही.