मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य कालिदास निळकंठ कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय घडामोडींचा वेग बघता अनेक गोष्टी ह्या वेग घेत आहेत.
कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत आठ वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळेस हंगामी अध्यक्ष असणे महत्वाचे असणार आहे. शिवसेनेतून राजकीय कारकिर्द सुरु करणारे कोळंबकर सध्या भाजपवासी आहेत. मधल्या काळात ते कॉंग्रेसमध्ये देखील होते.
शिवसेना-कॉंग्रेस-भाजप असा प्रवास असलेले कोळंबकर आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज बघतील. बाळासाहेब थोरात आणि कोळंबकर हे सध्या अनुभवी असलेले सदस्य या विधानसभेत असणार आहेत. मात्र कोळंबकर यांना यावेळी शपथ देण्यात आली. या शपथविधीला मुख्य सचिव अजोय मेहता, विधी व न्याय प्रधान सचिव आर. एन लढ्ढा, विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत आदी राजभवनात उपस्थित होते.