औरंगाबाद – कन्नड तालुक्यात ३१ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड घाटात दरडी कोसळून वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता. तब्बल अडीच महिन्यांनी हा रस्ता जड वाहतुकीसाठी मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून खुला करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे ३१ ऑगस्टला आठ ठिकाणी दरडी कोसळून रस्ता खचला. घाटाची मोठी हानी झाली. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करावा लागला. प्रवाशांना शिऊर, नांदगाव असा १२० किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता. यामुळे वेळ, पैसा अधिकचा लागत असल्याने नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात होता. दरम्यान, या रस्त्याचे काम राज पुन्शी (संत रामदास कन्स्ट्रक्शन, चाळीसगाव) यांना देण्यात आले आहे. त्यांनी तीन वेळा घाट खुला करण्याचे जाहीर करूनही अपूर्ण कामामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी नवी दिल्लीचे उपाध्यक्ष मिलिंद पाटील, राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सीताराम जाधव यांनी घाटात जागरण, गोंधळ, सत्यनारायण आंदोलन केले होते.
आता जड वाहतुकीसाठी रस्ता खुला झाल्याने दक्षिण भारताचे प्रवेशद्वार खुले झाले आहे. या घाटात आठ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. साठ फूट खोल दरीतूनवर पर्यंत बांधकाम करत संरक्षण भिंती बांधल्या आहेत. चाळीसगाव घाट पायथ्यापासून मध्यापर्यंत आठ किलोमीटर डांबरीकरण करण्यात आले आहे. दरी भागात भराव टाकला आहे. दोन्ही बाजूंनी रुंदीकरण केले आहे.