कराड- चांदोली मार्गावर ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचा चालक ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड| कराड-चांदोली मार्गावर नांदगाव, (ता. कराड) गावच्या हद्दीत ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टर चालक ठार झाल्याची घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. कलाजी भगवान मदने (रा. शेवाळवाडी-म्हासोली, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत ट्रॅक्टर मालक विक्रम दिलीप पाटील (रा. तांबवे) यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक दत्तात्रय विजय लोखंडे (रा. निंबवडे, ता. आटपाडी) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबवे येथील विक्रम पाटील यांचा ट्रॅक्टर (क्र. एमएच- 50- एस- 4435) असून त्यावर कलाजी मदने हे चालक होते. गुरूवारी पहाटे ऊस भरुन ते उंडाळेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी समोरुन आलेल्या ट्रकवरील (क्र. एम. एच. 10 सीआर 7778) चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रकची ट्रॅक्टरला जोराची धडक बसली. या अपघातात कलाजी मदने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार करत आहेत.